आज सोनियाचा दिनू
By Admin | Updated: November 6, 2016 00:28 IST2016-11-06T00:23:28+5:302016-11-06T00:28:23+5:30
बीड शनिवारी आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.

आज सोनियाचा दिनू
राजेश खराडे बीड
शनिवारी आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. निमित्तही तसेच होते. शेतकरी कुटुंबातील सोनाली तोडकर या लेकीने मंगरूळचे नाव जगाच्या नकाशावर नेले. सिंगापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदकावर जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने आपले नाव कोरले.
कुस्तीपटूंची परंपरा असलेल्या मंगरूळच्या मातीत घडलेल्या सोनालीच्या यशाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून गावचे नाव उंचावले. राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्यपदकापर्यंत झेप मारणारी ती मराठवाड्यातील पहिली कन्या ठरली आहे.
कुस्तीसाठी अवघ्या १६ व्या वर्षी तिने गाव सोडले. अवघ्या तीन वर्षात तिने यशामध्ये सातत्य ठेवत थेट सिंगापूरच्या स्पर्धेत स्थान मिळवले. अल्पभूधारक आई-वडील शेतात भागत नसल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवितात. अशा परिस्थितीत तिच्या या जिद्दीच्या पंखाला बळ हवे होते आर्थिक पाठबळ. या संदर्भात ‘लोकमत’ने तिच्या अडथळ्यांची शर्यत मांडली होती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आणि तिची सिंगापूर वारी निश्चित झाली. कुस्तीतील डावपेच वापरून प्रतिस्पर्ध्याला लोळविणे माहीत असलेल्या सोनालीने अडथळ्यांची शर्यतही मोठ्या जिद्दीने पार केली.
सिंगापूरमध्ये स्पर्धा सुरू झाली अन् तिने ५८ किलो वजन गटात आॅस्ट्रेलियन महिला खेळाडूला आस्मान दाखवून छाप सोडली. अंतिम स्पर्धेत मात्र तिला कोल्हापूरच्या मंजूकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, मोठ्या कष्टाने सिंगापूरचे मैदान गाजविणाऱ्या या लेकीचे गावकऱ्यांना मोठे कौतूक आहे.
शनिवारी सर्व गावकऱ्यांच्या नजरा तिच्या खेळाकडे लागल्या होत्या. मात्र, ऐनवेळी वीज गायब झाल्याने गावकऱ्यांची निराशा झाली. यावेळी काहींनी मोबाईलवरून आॅनलाईन तिच्या कौतूकाचा सोहळा पाहिला. तिच्या आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यामुळे त्यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तरूणांनी फटाक्यांची आतषबाजी करून हा विजयी क्षण यादगार केला.