‘सचखंड’ येथे आज श्री गुरुगोविंदसिंघजी जयंती
By Admin | Updated: January 15, 2016 23:38 IST2016-01-15T23:35:35+5:302016-01-15T23:38:18+5:30
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सचखंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी शहरातून नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.

‘सचखंड’ येथे आज श्री गुरुगोविंदसिंघजी जयंती
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड
श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सचखंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी शहरातून नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.
सचखंड येथे श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त एक आठवडा आधीपासूनच प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येते. गुरुद्वारा परिसरात विविध ठिकाणी सप्ताह पाठांचेही आयोजन करण्यात आले आहे. या पाठांची समाप्ती १६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त विशेष कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आले असून रात्री नऊ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हे कीर्तन दरबार चालणार आहे. यात देश-विदेशांतील नामवंत रागी जत्थे आपली हजेरी लावणार आहेत.
मध्यरात्री अडीच वाजता मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या अरदासनंतर गुरपुरबचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी श्री गुरुगोविंदसिंघजींच्या जीवनावर आधारित कथा सांगण्यात येणार आहे. परिसरात विविध ठिकाणी मिष्ठान्नाचे लंगर लावण्यात आले आहे.
चार वाजता सचखंड येथून विशेष नगरकीर्तन निघणार आहे. यात घोडे, निशान साहिब, गतका आखाडे, कीर्तनी जत्थे व ग्रामीण भागातील भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. हे नगरकीर्तन शहीद भगतसिंघरोड मार्गे जुना मोंढा, संतबाबा निधानसिंघजी चौक, महावीर स्तंभ, हनुमान पेठ, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, चिखलवाडी मार्गे सचखंड येथे येणार आहे. रात्री आतीषबाजी केली जाणार आहे.
जयंतीसाठी देश-विदेशांतून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरु सचखंड येथे आले असून यात्रेकरुंच्या निवासाची व्यवस्था विविध यात्री निवासात करण्यात आली आहे. यानिमित्त गुरुद्वारा परिसरात रोषणाई करण्यात आली ही रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे़ गुरुद्वाराचा अंतर्गत भाग फुलांनी सजवण्यात आला आहे.
श्री गुरुगोविंदसिंघजींचा जन्म बिहार राज्यातील पटना येथे झाला. त्यांनी अनंतपूर साहिब (पंजाब) येथे १६९९ मध्ये खालसापंथची स्थापना केली.देश व धर्मासाठी आपले पिता श्री गुरुतेग बहाद्दरजी व चार पुत्रांचे बलिदान देवून ते नांदेड येथे आले. १७०८ मध्ये नांदेड येथे गुरुग्रंथ साहिबजींना गुरुपद बहाल करुन स्वत: सचखंड गमन केले.