आज शंभर गुणांचा ‘पेट’चा दुसरा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST2021-03-13T04:07:04+5:302021-03-13T04:07:04+5:30
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उद्या शनिवारी, १३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान, पीएच.डी. ...

आज शंभर गुणांचा ‘पेट’चा दुसरा पेपर
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उद्या शनिवारी, १३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान, पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा दुसरा पेपर घेण्यात येणार असला, तरी या तीन तासांत विद्यार्थी केव्हाही ‘लॉग इन’ होऊ शकतो. मात्र, त्याला ९० मिनिटांत १०० गुणांचे १०० प्रश्न सोडवावे लागणार आहेत.
उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून ‘पेट’ झाली नव्हती. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना अनेक संशोधन करू इच्छिणारे विद्यार्थी, तसेच विद्यार्थी संघटनांनी प्रत्यक्ष भेटून, तसेच निवदनाद्वारे रखडलेली ‘पेट’ घेण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार, कुलगुरूंनी कोरोनाच्या काळातही ३० जानेवारी रोजी तब्बल ४५ विषयांसाठी ‘पेट’च्या पहिल्या पेपरची ऑनलाइन परीक्षा घेतली. पहिला पेपर ५० गुणांचा होता. १ फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये ६ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
आता उद्या १३ मार्च रोजी ‘पेट’चा दुसरा पेपर घेण्यात येणार असून, या पेपरसाठी १० व ११ मार्च रोजी ‘मॉकटेस्ट’ घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरप्रमाणेच कोठूनही मोबाइल, लॅपटॉप अथवा संगणकावर परीक्षा देता येईल. या परीक्षेत १०० गुणांचे १०० प्रश्न असतील व ९० मिनिटांचा वेळ असणार आहे. या पेपरचा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे, तर पहिल्या व दुसऱ्या मिळून दोन्ही पेपरचा निकाल २० मार्च रोजी जाहीर केला जाईल. त्यानंतर, प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.
पेट उत्तीर्ण, तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांना २२ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. एप्रिल महिन्यात संशोधन अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेण्यात येणार आहेत. पीएच.डी.साठी नोंदणीपूर्वी विद्यापीठामार्फत विषयनिहाय रिक्त जागा व गाइडची संख्या प्रकाशित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ८ एप्रिलपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी’ जमा करणे बंधनकारक राहील, तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी कळविले आहे.