आजपासून अंबडमध्ये रंगणार मान्यवरांची संगीत मैफील
By Admin | Updated: February 16, 2015 00:50 IST2015-02-16T00:40:14+5:302015-02-16T00:50:46+5:30
रवी गात , अंबड येथील प्रसिद्ध दत्त जयंती संगीत महोत्सवास शहरातील गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात १६ फेबु्रवारीपासून सुरुवात होत आहे

आजपासून अंबडमध्ये रंगणार मान्यवरांची संगीत मैफील
रवी गात , अंबड
येथील प्रसिद्ध दत्त जयंती संगीत महोत्सवास शहरातील गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात १६ फेबु्रवारीपासून सुरुवात होत आहे. या संगीत महोत्सवास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यासपीठावर मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या गायनाचार्य पंडीत गोविंदराव जळगांवकर यांच्या स्मृतिनिमित्त घेतल्या जाणाऱ्या या महोत्सवाने यंदा ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
अंबड तालुक्यातील भणंग जळगांव येथील कै. त्र्यबंकराव जळगांवकर यांचे गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर हे सुपुत्र. गोविंदराव यांच्या घरात सुरुवातीपासुन भजन, संगीत, कीर्तन आदींची आवड होती. या कला प्रकारांची आवड असल्याने बालपनापासुनच गोंविदराव यांच्यावर संगीताचा व इतर संगीत कला शास्त्राचा प्रभाव पडला. त्यांना सुरुवातीचे धडे त्यांच्या वडीलांपासून मिळाले.
नादलुब्ध संवेदनशीलता गोविंदरावांच्या ठायी असल्याने त्यांचे सर्व लक्ष या संगीत कला क्षेत्रात केंद्रीत होऊ लागले. त्यांच्या वडीलांच्या काळापासून दत्तजयंती उत्सवापासून संगीत महोत्सवास प्रारंभ झाला. या संगीत महोत्सवाला महाराष्ट्र पातळीवर आगळेवेगळे असे स्थान प्राप्त झाले. नव्याने परिवर्तित झालेल्या दत्तजयंती संगीत महोत्सवास व्यापक स्वरुप आले असून या महोत्सवात जागतिक किर्तीचे कलावंत आपली स्वसाधना सादर करतात. गोविंदराव जळगांवकर यांच्यासारख्या अलौकिक दर्जाच्या कलावंताने नेतृत्त्व केल्याने या संगीत महोत्सवाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
बालमनावर संगीताचे संस्कार झालेले गोविंदराव यांना सुदैवाने भारतविख्यात संत प्रवृत्तीचे धृपद गायक कै.भटजी बापु यांच्या घरंदांजगायकीचे प्रशिक्षण मिळाले. भटजी बापुंचे शार्गिर्द असलेल्या हैद्राबादच्या श्री नामपल्ली वासुदेवराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या संगीत साधनेला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी वासुदेवराव यांना अंबड येथे बोलावुन सतत पाच-सहा वर्षे संगीत कला शास्त्राचे अध्ययन केले.
या कालखंडात गुरुवर्य वासुदेवराव यांनी गोविंदराव यांच्याकडून स्वरसाधनेची मेहनत करुन घेतली. संगीत कला क्षेत्राचे धृपद गायन, ख्याल गायन, टप्पा, ठुमरी, नाटयसंगीत, कजरी, दादरा अशा सर्व प्रकारचे मागदर्शन गोविंदरावांना कै.वासुदेवराव यांच्याकडुन मिळाले. आणि अभिजात संगितातील हे सर्व प्रकारचे संगीत गोविंदराव सहजतेने मैफलित पेश करत. स्वप्त स्वरातील मुळ स्वर षडश:(सा) या स्तरावर अठरा-अठरा तास रियाज करुन त्यांच्या स्वरात एक प्रकारचे दिव्यत्व आले होते. संगीत कला क्षेत्रात ज्याला सा कळाला त्याला संगीत कला शास्त्राची सर्व प्रकारची सिध्दी प्राप्त होते असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय गोविंदरावांच्या गायनात प्रकर्षाने रसिकांना येत होता.
त्यांच्या गायनाचे कार्यक्रम राज्यातील तसेच देशातील विविध मेट्रोपोलिटन सिटी म्हणवल्या जाणाऱ्या शहरांमधुन झाले आहेत. गोविंदराव अंबड येथे संपन्न होणाऱ्या संगीत महोत्सवात आपले गायन आवर्जुन पेश करत. तेव्हा उपस्थित नामवंत कलावंताना आणि रसिकांना आनंदाचे डोही आनंद तरंग या उक्तिचा प्रत्यय येत होता. यावेळी या संगीत महोत्सवाचा सगळा परिसर आनंदाच्या कल्लोळात बुडुन जात. या दिग्गज गायकाच्या गायनाच्या रेकॉर्डस्ही एचएमव्ही या ख्यातनाम कंपनीने काढलेल्या आहेत.
अभिजात शास्त्रीय संगीताचे सर्वस्पर्शी ज्ञान असलेले गोविंदराव वारकरी संप्रदायाच्या सप्ताहातही शास्त्रीय पध्दतीने गायन करुन ग्रामीण भागातील हजारो वारकऱ्यांना मंत्रमुग्ध करत असत. नाटयकला क्षेत्रातील गोविंदरावांचे योगदान महत्वपुर्ण आहे. अंबड येथे त्यांनी अनेक वर्षे ग्रामीण नाटय महोत्सवात सहभागी होऊन नाटयकलेच्या क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिध्द केले.
गोविंदराव यांच्याकडे विविध प्रकारच्या वाद्यांचा मोठा साठा होता. सारंगी, सितार, आॅर्गन, हार्मोनियम, पखवाज, वायोलिन, दिलरुबा, इसराज, बासरी, तबले, तानपुरे आदी वाद्यांचा साठा पाहुन अनेक कलावंत आणि रसिक चकीत होत. या सर्व वाद्यांवर गोविंदरावांचे प्रभुत्व वादातीत होते. ते उत्तम हार्मोनियम वादक, सितार, व्हायोलिन, दिलरुबा, पखवाज या वाद्यांचे स्वतंत्र कार्यक्रम ते करीत होते. त्यांनी स्वरसाधना केलेली असल्याने त्यांच्या स्वरात विलक्षण तेजस्वीता आलेली होती. जळगावकर यांच्या स्मृतीनिमित्त साजरा होणाऱ्या अंबड येथील दत्त जयंती संगीत महोत्सवास दरवर्षी देशभरातील शास्त्रीय संगीतातील दिग्गजांची हजेरी असते.
भटजी बापु यांच्या घरंदांज गायकी परंपरेतील अभिजात गायकीचा वारसा तर गोविंदराव यांच्या गायनातुन रसिकांना हमखास जाणवत होता. परंतु त्यांच्या बरोबर मराठवाडयातील संत प्रवृत्तीची पंरपंराही गोविंदरावांनी आत्मसात केली असुन त्याचे दर्शनही त्यांच्या निर्मळ आणि शालिन स्वभावातुन प्रतित होत असे. मराठवाडयातील थोर संत, साहित्यिक आणि गायक,कलावंत असलेले सर्वज्ञ दासोपंत, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत नामदेव आणि संत भटजी बापु या अभिजात समर्थ गायकांच्या पंरपरेतील कला अविष्कार निष्काम मनाने करणारे आणि या संत प्रवृत्तीचा वारसा चालविणारे मराठवाडयातील थोर गायक कलावंत गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर हे एकमेव.