तूर खरेदीसाठी आज शेवटचा दिवस
By Admin | Updated: June 10, 2017 00:09 IST2017-06-10T00:08:40+5:302017-06-10T00:09:30+5:30
नांदेड : केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीसाठी १० जून डेडलाईन देण्यात आलेली आहे.

तूर खरेदीसाठी आज शेवटचा दिवस
रामेश्वर काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीसाठी १० जून डेडलाईन देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाचे पुढील मुदतवाढीचे आदेश प्राप्त होईपर्यंत दिलेल्या मुदतीपर्यंतच तुरीची खरेदी केली जाईल, असे नाफेडकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर ६ जूनपर्यंत केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडमार्फत ५ हजार ९९२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. तूर खरेदीबाबत केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तूर खरेदीसाठी शासनाकडून मुदतवाढ देण्याबाबत पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस खरेदी केंद्रावर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेतील तुरीचे दर टिकून रहावेत, यासाठी केंद्र शासनाने ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या शासकीय हमी दराने प्रारंभी जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर नाफेडमार्फत २२ एप्रिलपर्यंत १ लाख १२ हजार २९८ क्विंटल तुरीची खरेदी केली.
त्यानंतर पुन्हा राज्य शासनामार्फत खरेदी केंद्रावर शिल्लक असलेल्या तुरीचे पंचनामे करुन ११ मे २०१७ पर्यंत १४ हजार ५०८ क्विंटल तुरीची खरेदी केली. केंद्राच्या आदेशान्वये २८ मे पर्यंत नाफेडमार्फत १६ हजार ८९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तसेच त्यानंतर राज्य शासनाकडून ५ जूनपर्यंत ५ हजार २१० क्विंटल तुरीची खरेदी केली. केंद्राच्या आदेशानुसार नाफेडमार्फत १० जून २०१७ पर्यंत तुरीची खरेदी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर ६ जूनपासून ५ हजार ९९२ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
हमीभावानुसार तुरीची खरेदी करण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र सुरु होते. मात्र त्यापैकी नायगाव, बिलोली व मुखेड येथील खरेदी केंद्र बंद केले असून अर्धापूर, भोकर, हदगाव, नरंगल व धर्माबाद येथील खरेदी केंद्र सुरु आहेत. काही तूर खरेदी केंद्रावरील बोगस तुर खरेदी समोर आल्यानंतर नाफेडच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही प्रत्येक खरेदी केंद्रावर लक्ष देऊन आहेत.
शासनाकडून तुरीची खरेदी ३१ मेपर्यंत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र सगळ््याच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेवून शासनाने १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु १० जूनपर्यंतही सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शक्य नसल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.
शासनाकडून १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत असला तरी प्रत्यक्षात मुदतवाढीबाबत शासनाचे परिपत्रकच नाफेडकडे आलेले नाही.