मनधरणीचा आज शेवटचा दिवस

By Admin | Updated: October 1, 2014 00:44 IST2014-10-01T00:44:24+5:302014-10-01T00:44:24+5:30

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़

Today is the last day of the discussion | मनधरणीचा आज शेवटचा दिवस

मनधरणीचा आज शेवटचा दिवस


लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़ कोण, किती मते घेऊ शकतो, याची प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे़ त्यानुसार अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़ दोन दिवसांत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘मन’धरणी करणारे उमेदवार आज अपक्षांना प्रत्यक्ष भेटी देऊन विनवणी करणार आहेत़
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १७८ उमेदवारांनी २७२ अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ३२ जणांचे अर्ज बाद झाले आहेत़ अर्जाच्या छाननीनंतर कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात राहणार याची उत्सुकता लागलेल्या मतदारांना आज चित्र स्पष्ट होणार आहे़ नामनिर्देशनपत्र दाखल करताना एकमेकांना पाण्यात पाहणारे उमेदवार अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षांना गळ लावून समर्थक वाढविण्याच्या तयारीत आहेत़ लातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ६ जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत़ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक अपक्षांच्या संपर्कात होते़ लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा व लातूर ग्रामीण मतदारसंघातील बहुतांश अपक्षांनी मंगळवारपर्यंत प्रमुख उमेदवारांना तळ्यात-मळ्यात ठेवले होते़ (प्रतिनिधी)
लातूर शहर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी खा़ डॉ़ जनार्दन वाघमारे, अ‍ॅड़ बळवंत जाधव, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे हे माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ भाजपाचे अ‍ॅड़ बळवंत जाधव माघार घेणार की अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ लातूर ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आशाताई भिसे या माघार घेतील, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे़ त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे़
भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत़ पक्षाने एबी फॉर्म दिलेले उमेदवार अपक्षांच्या मनधरणीत आहेत़ काही ‘हौसी’ उमेदवार स्वत:हूनच कोण काय देतो, याची चाचपणी करीत मंगळवारी फिरत होते़
अपक्ष उमेदवारात जास्त मते घेण्याची शक्यता असलेल्या उमेवारांची राजकीय पक्षांत मनधरणी सुरू आहे़ निवडून आल्यावर तुम्हाला हवे ते पद देऊ़ तुमची इच्छा पूर्ण करू, असे आश्वासन दिले जात आहे़ तर काही अपक्षांनी आपल्या दुतामार्फत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे सेटलमेंटचे प्रस्ताव दिले आहे़ नवख्या असलेल्या काही उमेदवारांनी सर्वच राजकीय पक्षांचे दार ठोठावले आहे़ कोण कोणाला ‘किती’ समर्थन देतो, त्यावरून पाठिंबे निश्चित होणार आहेत़ काही ठिकाणी उमेदवारी राहु द्या म्हणून तर काही ठिकाणी काढून घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़

Web Title: Today is the last day of the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.