छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या वतीने वीजग्राहकांकडे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर बसवले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात आतापर्यंत ५६ हजार टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर पोस्टपेड असून मीटर रीडिंगनुसारच बिल देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात सध्या नवीन वीज जोडणी व सौरऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. तसेच जुने मीटर बदलून त्याजागीही टीओडी मीटर बसवले जात आहेत. मीटरसाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसवण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
असे आहे टीओडी मीटरटीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळू शकेल. या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येते याची खात्री ग्राहकाला करता येणार आहे.
२७ हजार ग्राहकांचे जुने मीटर बदललेसध्या महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात आतापर्यंत ५६ हजार ९४० ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यात नवीन वीजजोडणीच्या २१ हजार ९४४ मीटरचा समावेश आहे. २७ हजार ८३६ ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या जागी टीओडी मीटर बसवले आहेत, तसेच पीएम-सूर्यघर योजनेत छतावर सौर ऊर्जा संच आस्थापित केलेल्या ७ हजार १६० ग्राहकांनाही टीओडी मीटर बसवले आहेत.
ऑटोमॅटिक रीडिंगटीओडी मीटरमुळे ग्राहकांना वीजवापराची रिअल टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ऑटोमॅटिक रीडिंगमुळे अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. ग्राहकांनी कोणताही गैरसमज न बाळगता टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण