पीक विम्यासाठी तोबा गर्दी
By Admin | Updated: August 2, 2014 01:44 IST2014-08-02T01:27:17+5:302014-08-02T01:44:23+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामाची उशिराने पेरणी झाली. जिल्ह्यात अखेर मुदतीला महा ई- सेवा केंद्र बंद पडल्याने सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली
पीक विम्यासाठी तोबा गर्दी
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामाची उशिराने पेरणी झाली. जिल्ह्यात अखेर मुदतीला महा ई- सेवा केंद्र बंद पडल्याने सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आणि बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.
कृषी विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांत जनजागृती केल्याने ३१ जुलै मुदतीअखेर ४० ते ५० हजार शेतकऱ्यांना पिकांना संरक्षण देता आले. दरवर्षी अत्यल्प पाऊस अन् कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव यातून शेतकरी सावरलेला नाही. परंतु कृषी विभागाने आता पिकांनाही संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद, मूग इत्यादी पिकांना संरक्षण शेतकऱ्यांनी दिले आहे. उच्च जोखीम स्तर आणि अतिरिक्त विमा संरक्षण, अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण विमा असा स्तर ठरविण्यात आला होता. ज्यांच्याकडे जास्तीचे क्षेत्र आहे, त्यांनी जास्त जोखमीचा विमा भरला, तर अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी यंदा बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. बँकेत बसून शेतकऱ्यांची कागदपत्रे कृषी सहायकांनी तपासून ते बँकेत दाखल केले जात होते. परंतु अनेकांना सातबारा उतारा न मिळाल्याने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू विभाग गाठावा लागला.
बाजरीला प्रतिहेक्टरी (संरक्षित रक्कम ६,४०० रुपये) शेतकऱ्यांचा विमा हप्ता २२४ ते २०२ रुपये तर कापूस (संरक्षित रक्कम २१,२०० रुपये), शेतकऱ्यांचा विमा हप्ता २,७५६ रुपये, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी २,४८० रुपये, मका पिकांसासाठी (संरक्षित रक्कम २१,४०० रुपये) शेतकऱ्यांचा विमा हप्ता ५३५ ते ४८२ रुपये, सोयाबीन (संरक्षित रक्कम १७,२००) शेतकऱ्यांचा विमा हप्ता ६०२ ते ५४२ रुपये असा वेगवेळा स्तर ठरलेला आहे. त्यामुळे पीक जोमात आले तर रक्कम बुडाली आणि पिकांनी धोका दिला तर विम्यातून शेतकऱ्यांची ओटी भरून निघेल यासाठी गर्दी वाढली होती.
मुदतवाढीची मागणी
कागदपत्रांसाठी ग्रामीण व तालुका पातळीवरील महा ई-सेवा केंद्राचे नेटवर्क हँग झाल्याने शेतकऱ्यांना तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खेटे घालावे लागल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. त्यामुळे मुदत वाढून द्यावी, अशी मागणी शेतकरी सिकंदर जाधव, कारभारी भावले, पूनम बैनाडे, शांतीलाल शेहरे, दादासाहेब सरोदे, कडुबा जाधव, साईनाथ मते, अशोकराव हिवराळे आदींनी केली आहे.
दर महिन्याअखेरचा प्रश्न
तहसीलदार विजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, महिन्याच्या शेवटच्या दिवशी नेटवर लोड पडल्यामुळे महासेवा केंद्रावरही परिणाम होतो; परंतु तहसील कार्यालयातील सेतूतून सातबारा व अर्ज शेतकऱ्यांना काढता आले.
गैरसोयीतून काही शेतकऱ्यांना जावे लागल्याच्या बाबीला त्यांनीही दुजोरा दिला.