मार्चअखेरपर्यंत थकीत शुल्क द्या
By Admin | Updated: March 26, 2016 23:51 IST2016-03-26T23:51:07+5:302016-03-26T23:51:07+5:30
औरंगाबाद : ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे मागील चार वर्षांचे थकीत शुल्क ३१ मार्चपर्यंत विनाअनुदानित शाळांना द्यावे,

मार्चअखेरपर्यंत थकीत शुल्क द्या
औरंगाबाद : ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे मागील चार वर्षांचे थकीत शुल्क ३१ मार्चपर्यंत विनाअनुदानित शाळांना द्यावे, अन्यथा राज्यातील एकही इंग्रजी माध्यमाची विनाअनुदानित शाळा २५ टक्के प्रवेशप्रक्रिया राबविणार नाही, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना निवेदन सादर केले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने २५ टक्के प्रवेशाची थकीत रक्कम न दिल्यास मोफत प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मेस्टाने घेतला आहे. मागील वर्षी २५ टक्क्यांतर्गत मोफत प्रवेश दिल्याचा थकीत परतावा मिळावा म्हणून राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यानंतर आरटीईच्या मोफत प्रवेशावर बंदी घालण्याचे आंदोलन केल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संघटनेला २७ एप्रिल २०१५ रोजी मंत्रालयात चर्चेला बोलावले. त्या बैठकीत इयत्ता पहिलीच्या वर्गापासून मोफत प्रवेशाचा एंट्री पॉइंट निश्चित करण्यात आला. त्याच बैठकीत एका महिन्याच्या आत मागील चार वर्षांचा थकीत परतावा देण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर दोन वर्षांचा मोफत प्रवेशाचा परतावा इंग्रजी शाळांना देण्यात आला. उर्वरित मोफत प्रवेशाचा थकीत परतावा लवकरात लवकर अदा करावा, अन्यथा २५ टक्के मोफत प्रवेशावर इंग्रजी शाळांना बहिष्कार टाकण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. निवेदनावर ‘मेस्टा’चे अध्यक्ष संजय तायडे, मनीष हांडे, प्रल्हाद शिंदे, प्रवीण आव्हाळे, अमित भोसेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जि.प.ची एक शाळा घेणार दत्तक
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या (मेस्टा) वतीने प्रत्येक जिल्ह्यातील एक जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घेऊन त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रयत्न केला जाणार आहे.