उमेदवारांची दमछाक !
By Admin | Updated: October 9, 2014 00:38 IST2014-10-09T00:21:11+5:302014-10-09T00:38:37+5:30
आशपाक पठाण , लातूर विधानसभा निवडणुकीचा धुमधडाका दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर जोरदारपणे सुरू आहे. प्रचारासाठी वेळ कमी असल्याने उमेदवार सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत

उमेदवारांची दमछाक !
आशपाक पठाण , लातूर
विधानसभा निवडणुकीचा धुमधडाका दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर जोरदारपणे सुरू आहे. प्रचारासाठी वेळ कमी असल्याने उमेदवार सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत मतदारांच्या गाठीभेटी, प्रचारसभा यात गुंतले आहेत. आघाडी, युती तुटल्यामुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीचा दिवस करून प्रचारात गुंतलेल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे. सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने आतापासूनच नेत्यांनी काऊंट डाऊन सुरू केले आहे.
१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट होताच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यातच दसऱ्याचे सोने लुटण्याचा योग आल्याने उमेदवारांनी याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला. रुसवे-फुगवे असलेल्या कार्यकर्त्यांना विशेष भेट देऊन उमेदवारांनी एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विविध ठिकाणी कॉर्नर बैठका व प्रभागनिहाय रॅली आता काहिशी थंडावली आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील स्टार प्रचारकांच्या सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. ‘आपलाच पक्ष कसा सरस आहे’, हे दाखवून देण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर या सहाही मतदारसंघांत पंचरंगी लढती होत आहेत.
युती, आघाडी शेवटच्या दिवसापर्यंत होणार की तुटणार, याचा मागमूस उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही न लागल्याने ऐनवेळी धावपळ सुरू झाली आहे.