धार्मिक स्थळांसाठी कालबद्ध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:32 IST2017-08-12T00:32:15+5:302017-08-12T00:32:15+5:30
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्याबाबत शुक्रवारी धार्मिक स्थळ समितीने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला.

धार्मिक स्थळांसाठी कालबद्ध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्याबाबत शुक्रवारी धार्मिक स्थळ समितीने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. लवकरच मनपाकडून १,०५५ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांचे आक्षेप, सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत.
धार्मिक स्थळ समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नमूद केले की, न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरूच राहणार आहे. प्रत्येक आठवड्याला खंडपीठात कारवाईचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी समितीचे सर्व १३ सदस्य आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत खंडपीठाच्या आदेशाचा तपशील समजावून सांगण्यात आला. त्यानंतर सदस्यांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. १,१०१ धार्मिक स्थळांपैकी ४६ धार्मिक स्थळे मनपाने आतापर्यंत काढली आहेत. उर्वरित १,०५५ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यावर एकमत झाले. यादी प्रसिद्ध झाल्यावर सूचना, हरकती आणि आक्षेप आठ दिवसांमध्ये मागविण्यात येतील. नागरिकांकडून प्राप्त आक्षेपांची छाननी करण्यात येईल. ‘अ’ प्रवर्गातील ५०८ धर्मिक स्थळे नियमित करण्यासारखी आहेत. ‘ब’ प्रवर्गातील ५८० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे आहेत. यातील ३६८ धार्मिक स्थळे खाजगी जागेवर आहेत. खाजगी जागेवरील धार्मिक स्थळे काढण्याचा काही संबंध येत नाही. संपूर्ण वर्गीकरण केल्यावर महापालिका अंतिम यादी जाहीर करणार आहे. रस्त्यात अडसर ठरणारे, मनपाच्या किंवा शासकीय जागेवर असलेले आणि जी धार्मिक स्थळे नियमित होऊच शकत नाहीत ती यादी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका परत एकदा कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.