बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: June 22, 2014 00:04 IST2014-06-21T23:21:56+5:302014-06-22T00:04:21+5:30
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत.

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत. चौकाचौकात लोकांकडे जाऊन त्यांची करमणूक करून अर्थार्जनही करीत आहेत. बहुरूपींचा पिढ्या न पिढ्याचा हा व्यवसाय असला तरी आता समाजातून त्यांना म्हणावे तसे अर्थार्जन होत नसल्याने अशा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
बहुरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख आहे. बहुरूपी मनोरंजनासह कधी-कधी खबऱ्या म्हणूनही काम करतात. विशिष्ट कला असलेल्या बहुरूपींना समाजात मान असतो. बहुरूपी समाजाचेही कोणत्या गावात कोणी जावे हे ठरलेले असते, असे कोळगाव येथे आलेले बहुरूपी सुभाष शिंदे यांनी सांगितले.
सुभाष शिंदे हे वयाच्या दहाव्या वर्षीपासून बहुरूपी म्हणून गावोगाव जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या. ठराविक नागरिकांची सासरवाडी कोठे आहे, काहींच्या बहिनी कोठे दिलेल्या आहेत आदींबाबत माहितीही बहुरूपी ठेवत असल्याचे शिंदे म्हणाले.
गावातील सरपंच, पोलीस पाटील यासह प्रमुख विक्रेते, गावातील ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचीच माहिती ठेवावी लागत असल्याचे घोडेगाव तालुका नेवासा येथील बहुरूपी बाबाजी शेंगर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्हाला असंख्य दु:ख असली तरी आम्ही ज्यांच्याकडे जातो त्यांना आम्हाला हसवावेच लागते. नकला, विशिष्ट लयीत बोलून, कोट्या करून लोकांचे मनोरंजन करावे लागते. यातून अर्थार्जनही होते. अनेकदा उन, वारा, पाऊस यांची तमा न करता बहुरूपी गावालगत वास्तव्यास असतात. अशावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र काही ठिकाणी आजही सन्मानाची वागणूक मिळते तसेच चहा, नाष्टा, जेवण आदींची विचारपूस मोठ्या आस्थेने करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. बहुरूपी पोलिसांसारखे वेश करीत असल्याने अनेकदा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणतात तर लहान मुलांची करमणूक होत असल्याचे बाबाजी शेंगर यांनी सांगितले. (वार्ताहर)
या समाजासमोर शिक्षण, आरोग्य हे महत्वाचे प्रश्न असल्याचे सुभाष शिंदे यांनी सांगितले. पोट भरण्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनांची माहितीही मिळत नसल्याचे शिंदे म्हणाले. त्यातच गेल्या काही दिवसांत बहुरूपींना दान देण्याचे प्रमाणही कमी झाल्याने या समाजाच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.