सलूनचालकांवर घरोघरी सेवा देण्याची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:36+5:302021-05-07T04:04:36+5:30
हर्सूल, भगतसिंगनगर, मयूर पार्क, पिसादेवी रोड येथील सलूनची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने व्यावसायिकांवर खरोखरच उपासमारीची पाळी आलेली आहे. अशातच ...

सलूनचालकांवर घरोघरी सेवा देण्याची वेळ!
हर्सूल, भगतसिंगनगर, मयूर पार्क, पिसादेवी रोड येथील सलूनची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने व्यावसायिकांवर खरोखरच उपासमारीची पाळी आलेली आहे. अशातच अनेकांच्या दाढी-कटिंगचे वांदे झाल्याने सलून व्यावसायिक घरपोहोच सेवा देण्याचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी सलून व्यवसायिकांनी आपल्या मर्जीतील ग्राहकांचे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा स्थापन केलेले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्याने सलून व्यावसायिकांवरही घरोघर फिरण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे प्रत्येक जण संकटात सापडला आहे, त्याला सलून व्यावसायिकही अपवाद नाहीत. ज्या लहान घटकातील कारागिरांची उपजीविका छोट्या-छोट्या धंद्यावर अवलंबून आहे, या परिस्थितीत सामान्य वर्गातील व्यक्तीला कौटुंबिक गाडा चालविणे जिकिरीचे झाले आहे. शहरात विविध नागरी वसाहतींमध्ये या आजाराची भीती दिसू लागली आहे. त्यामुळे सलून दुकाने दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. मात्र प्रत्येक नागरिक घरी दाढी-कटिंग करीत नाहीत. लहान मुले, पुरुष यांच्या कटिंग करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांना घराकडे बोलावून, सामाजिक अंतर पाडून, कटिंग-दाढी करून घेतली जात असली तरी या धंद्याला म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी नरेंद्र केराळे, सुनील बोराडे, रामकृष्ण वाघ या सलून व्यावसायिकांनी केली आहे.