उदरनिर्वाहासाठी नदीतून नाणे उचलण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:13 IST2017-09-04T00:13:41+5:302017-09-04T00:13:41+5:30
शहागडमधील अनेक तरुणांना दशक्रिया विधीनंतर गोदावरी पात्रात टाकल्या जाणाºया वस्तू व नाणी शोधण्याचे काम करावे लागत आहे.

उदरनिर्वाहासाठी नदीतून नाणे उचलण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही आणि पावसाअभावी शेतीत राम नाही. त्यामुळे हाती दोन पैसे कसे पडून पोटाची खळगी भरण्यासाठी शहागडमधील अनेक तरुणांना दशक्रिया विधीनंतर गोदावरी पात्रात टाकल्या जाणाºया वस्तू व नाणी शोधण्याचे काम करावे लागत आहे.
परिस्थितीशी दोन हात करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी अर्थाजनाचा असा मार्ग निवडावा लागत आहे.
शहागड येथे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जोडण्यासाठी गोदावरी नदी पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलाखाली दशक्रिया विधी घाटावर मोठी गर्दी असते. दशक्रिया विधीसाठी आलेले ग्रामस्थ विधी आटोपून नदीच्या पात्रात पूजेचे सामान सोडतात. ज्यामध्ये कपडे, नारळ, वस्तू, पैशांचे नाणे असतात. तसेच प्रवासा दरम्यान नदी ओलांडताना श्रध्दाळू भाविक नदीपात्रात नारळ, एक, दोन, पाच, दहा रु पयांचे नाणे फेकतात.
शहागड, खामगाव परिसरातील अनेक कुटुंबातील तरुण व पुरुष मंडळी नदीपात्रात हे पैसे गोळा करण्याचे काम करतात.
हातात लोखंडी टोपले व फावडे घेऊन नदीतील खोल पाण्यात जाऊन अस्थि विसर्जन केलेल्या ठिकाणची माती, वाळू, राख, गाळ टोपल्यात घेतात. पाण्याबाहेर येऊन त्याची चाळणीत पाहणी करतात. यात कधी नाणी तर कधी जळालेल्या दागिन्यांचे भाग सापडतात. खूप खोल पाण्यात जाणे शक्य नसल्याने लाकडी फळीला चुंबक बांधून पाण्यात फळी फेकली पाण्यात जाते.
दिवसभरात नदीच्या पात्रात दशक्रिया विधी, अस्थि विसर्जन अधिक प्रमाणात झाल्यास एका व्यक्तीस दोनशे ते चारशे रुपये मिळतात.
एखाद्या वेळी सोन्याचा दागिना, चांदीचे नाणे मिळाल्यास हजार, दीड हजार रु पयांपर्यंत कमाई होते, असे यातील काहींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.