५५ लाख लिटर पाणी उचलूनही तहान भागेना
By Admin | Updated: April 18, 2016 00:55 IST2016-04-18T00:47:35+5:302016-04-18T00:55:31+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन

५५ लाख लिटर पाणी उचलूनही तहान भागेना
राजकुमार जोंधळे , लातूर
शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन २ लाख ५० हजार असे दररोज पाणी उचलले जात आहे़ दिवसाला जवळपास ५५ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी संकलित करुन मनपाच्या १४० टॅँकरव्दारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाण्याची ओरड लातूरकरांची कायम आहे़ पुरेसे पाणी पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़
एका कुटूंबाला ८ दिवसाला २०० लिटर पाणी दिल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी नागरिक मात्र यावर समाधानी नाहीत़ नियोजनाच्या अभावामुळे पाणी वितरण व्यवस्थित होत नसल्याचे नागरिक म्हणत आहेत़
शहरातील एकूण ३५ प्रभागात प्रत्येकी दोन टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत पूर्णत: आटल्याने, पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न प्रशासनासमोर होता. आज पाणी संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मात्र संकलित पाण्याची वितरण व्यवस्था ‘ढिसाळ’ असल्याने पाण्याला पाय फुटू लागले आहेत. काही नगरसेवकांची दांडगाई आणि ज्यांच्या मनगटात पाणी आहे, अशा नगरसेवकांकडून प्रशासनाच्या छाताडावर बसून हे टॅँकर पळविले जात आहेत. पाणी वाटपात होणारा दुजाभाव सर्वसामान्यांच्या मुळावर उठला आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर आपली तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना पाणीटंचाईच्या झळांची ‘झळ’ लागत नाही. मात्र ज्यांना घोटभर पाण्यासाठी शहरातील सार्वजनिक विंधन विहरीवर थांबावे लागते, अशांचे बेहाल आहेत. ४४ अंश उन्हाच्या चटक्यासोबत आता पाणीटंचाईचा चटकाही सहन करण्याची वेळ लातुरातील सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. इथल्या सर्वसामान्यांना दुष्काळ भयान वाटत असला तरी, प्रशासनाला मात्र तो ‘सुकाळ’च वाटतो आहे.
शहरात संकलित करण्यात आलेल्या पाण्याचे टॅँकरच प्रशासनाच्या मदतीने काही नगरसेवकांनी पळविल्याची माहिती आता पुढे आली आहे. एकाच प्रभागात सातत्याने पाणीपुरवठा केला जात असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. ज्या प्रभागात गेल्या तीन आठवड्यांपासून टॅँकरच फिरकले नाही, अशा नागरिकांनी पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्री केली आहे. भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून मात्र पाणीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव आणि साई बॅरेजेसमधून एवढे पाणी उचलूनही शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी नसल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़