ग्रामपंचायतींकडे दहा कोटींची थकबाकी
By Admin | Updated: November 28, 2014 01:11 IST2014-11-28T00:09:31+5:302014-11-28T01:11:53+5:30
हणमंत गायकवाड, लातूर या ना त्या कारणाने जिल्ह्यातल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोमात गेल्या असून, संबंधीत ग्रामपंचायतीनेही पाणीपट्टी भरली नसल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत़

ग्रामपंचायतींकडे दहा कोटींची थकबाकी
हणमंत गायकवाड, लातूर
या ना त्या कारणाने जिल्ह्यातल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोमात गेल्या असून, संबंधीत ग्रामपंचायतीनेही पाणीपट्टी भरली नसल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झालेल्या १४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची एकूण १०़१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे़ त्यामुळे देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही़ जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींना नोटिसा पाठविल्या़ परंतु या नोटिसांना केराची टोपली दाखविल्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे मातेरे झाले आहे़
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील ५२ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, वळसंगी येथील ५ खेडी, मोघा येथील ११ खेडी, किनगाव-हंगेवाडी येथील ६ खेडी, किनगाव-देवखरा येथील ६ खेडी, किनगाव-सोनखेड ६ खेडी, अंधेरी-दामपूरी ४ खेडी, ३० खेडी किल्लारी, ६ खेडी चाकूर, १७ खेडी आटोळा, २० खेडी उटी खुर्द, ६ खेडी मुरुड, ५ खेडी बिटरगाव आणि ९ खेडी शिवपूर योजनेअंतर्गत १३५ गावांना कायमस्वरुपी पाणीपुरवठ्याची सोय आहे़ परंतु या योजनेवरील पाणीपट्टी जमा होऊ शकली नाही़ त्यामुळे देखभाल दुरुस्ती झाली नाही़ या योजनेअंतर्गत असलेल्या १३५ ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाने पाणीपट्टी भरण्याचे निर्देश दिले़ शिवाय नोटिसाही पाठविल्या़ परंतु संबंधीत सरपंचांनी या नोटिसांना केराची टोपली दाखविली़ त्यामुळे या योजना बंद पडल्या आहेत़ केवळ देखभाल दुरुस्तीला पैसा नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या योजना मातीमोल झाल्या आहेत़ या योजनेअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांची तत्कालीन जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी बैठक घेतली़ आपल्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची पाणीपट्टी भरा, आपण देखभाल दुरुस्ती करु, असे सुचविले़ परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे योजना कोमात गेल्या आहेत़ जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या सर्कलमधील सर्कलमधील सरपंचांची बैठक घेतली़ ग्रामसेवकांच्या मदतीने पाणीपट्टी वसूल करुन ती जमा केल्यानंतर त्या पाणीपट्टीतून योजनांची दुरुस्ती करता येईल, असे सुचविले़ परंतु सरपंचांनी या सुचनेकडे कानाडोळा केला़ त्यामुळे या योजना बंदच आहेत़ आता या १३५ गावांत पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे़
जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झालेल्या अहमदपूर ५२ खेडी योजनेत ३२़८१ लाख, वळसंगी ५ खेडी योजनेत २८़१३ लाख, मोघा ११ खेडी योजनेत ११़७४ लाख, हंगेवाडी ५ खेडी योजनेत २़२७ लाख, देवकरा ६ खेडी योजनेत ३़२६ लाख, सोनखेड ६ खेडी योजनेत २़४ लाख, अंधोरी ४ खेडी योजनेत १़८० लाख, किल्लारी ३० खेडी योजनेत ५९़७२ लाख, चाकूर ६ खेडी योजनेत ८़१५ लाख, आटोळा १७ खेडी योजनेत ८़९४ लाख, उटी खुर्द २० खेडी योजनेत ४़६८ लाख, मुरुड ६ खेडी योजनेत २४़७७ लाख, बिटरगाव ५ खेडी योजनेत ५़२० लाख, शिवपूर ९ खेडी योजनेत १३़८७ लाख पाणीपट्टीची थकबाकी आहे़ या थकबाकीतून पाणी जिल्हा परिषदेच्या फंडातून देखभाल दुरुस्ती होऊ शकते़ परंतु ग्रामस्थ व सरपंचांचा प्रतिसाद मिळत नसल्याने योजना असून नसल्यासारख्या आहेत़
हस्तांतरीत झालेल्या १४ व हस्तांतरणाविना रखडलेल्या १२ योजनांची दुरुस्ती झाली असती तर २०६ गावांचा पाणीप्रश्न मिटला असता.