सिल्लेखान्यात वाघाची कातडी जप्त

By Admin | Updated: November 6, 2014 01:37 IST2014-11-06T01:20:59+5:302014-11-06T01:37:56+5:30

औरंगाबाद : शिकार केलेल्या वाघाची कातडी घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सिल्लेखाना येथे सापळा रचून अटक केली.

The tigress seized in the writing | सिल्लेखान्यात वाघाची कातडी जप्त

सिल्लेखान्यात वाघाची कातडी जप्त



औरंगाबाद : शिकार केलेल्या वाघाची कातडी घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सिल्लेखाना येथे सापळा रचून अटक केली.
रवी श्रीहरी अधाने (३३, रा. कैलासनगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. या कातडीची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २० लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी रवी याच्याकडे वाघाची कातडी आहे, ती कातडी बॅगमध्ये टाकून तो ग्राहक शोधण्यासाठी आपल्या दुचाकीवर (क्र. एमएच- २०- सीडब्ल्यू- ५९३७) सिल्लेखाना मार्गे जाणार आहे, अशी माहिती एका खबऱ्याने क्रांतीचौक ठाण्याचे फौजदार सय्यद सिद्दीक यांना दिली. माहिती मिळताच फौजदार सिद्दीक यांनी सिल्लेखान्यात सापळा रचला. साडेसहा वाजेच्या सुमारास खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाच्या दुचाकीवर आरोपी रवी येत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी झडप मारून त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची झडती घेतली, तेव्हा त्यात वाघाची कातडी आढळून आली. लगेच पोलिसांनी आरोपी रवीला अटक केली. त्याच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रात्री क्रांतीचौक पोलिसांनी ही कातडी वन विभागाच्या स्वाधीन केली. वाघाची शिकार करणे, त्याच्या अवयवाची विक्री, तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे, हे विशेष.
आरोपी रवीला जालन्यातील एका व्यक्तीने ही कातडी दिली असल्याचे तपासात समोर आले आहे. जालन्याच्या त्या व्यक्तीने हैदराबादहून कातडी आणल्याचे आपल्याला सांगितले होते, असे रवीने अटकेनंतर पोलिसांना सांगितले.
४या वाघाची शिकार कोठे झाली, आरोपी रवीला कातडी देणारे कोण आहेत, ती कातडी कोण खरेदी करणार होते, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The tigress seized in the writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.