छावणीच्या आखाड्यात लागणार दिग्गजांचा कस
By Admin | Updated: December 8, 2014 00:23 IST2014-12-08T00:17:04+5:302014-12-08T00:23:07+5:30
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा येथील दिग्गजांचा कस लागणार आहे.

छावणीच्या आखाड्यात लागणार दिग्गजांचा कस
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा येथील दिग्गजांचा कस लागणार आहे. छावणीची निवडणूक नेहमीच राजकीय पक्षांऐवजी व्यक्तींभोवतीच फिरत आलेली आहे. त्यामुळे याही वेळी आपापले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी छावणीतील दिग्गज कामाला लागले आहेत.
छावणी परिषदेची निवडणूक ११ जानेवारी रोजी होत आहे. त्यासाठी सात वार्डांमधून तब्बल ५७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये दिग्गजांचा समावेश आहे. या वेळी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्षच निवडणुकीत उतरलेले आहेत. उर्वरित पक्षांनी या ठिकाणी आपले उमेदवार दिलेले नाहीत. असे असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते अपक्ष म्हणून मात्र रिंगणात उतरलेले आहेत.
२००८ सालापासून सेना, भाजपाने या ठिकाणी आपले उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी मात्र कोणत्याही पक्षातर्फे येथे निवडणुका लढविल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळेच छावणीच्या निवडणुका कायम ठराविक व्यक्तींच्या भोवती फिरत आलेल्या आहेत. सुरुवातीला डी. एस. मोरे, दशरथ डवणे, सरदार ग्यानसिंग, रूपचंद राजपूत यासारख्या व्यक्तींचा या भागात बराच काळ प्रभाव होता. त्यानंतरच्या काळात गेल्या काही वर्षांपासून अशोक सायन्ना, किशोर कच्छवाह, करणसिंग काकस यासारख्या व्यक्तींचा प्रभाव आहे. यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक जण कामाला लागले आहेत. माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, किशोर कच्छवाह, आयुब लाला, अब्दुल हनिफ तसेच प्रशांत तारगे, संजय गारूल, रमेश लिंगायत, सागर दरक, दिलीप सुतार, रफत बेग आदींसह अनेक जण रिंगणात उतरले आहेत. याशिवाय करणसिंग काकस आणि अशोक सायन्ना हे दोघे स्वत: निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांच्या समर्थक उमेदवारांसाठी त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.