अतिपावसामुळे तूर पिकाचे नुकसान !
By Admin | Updated: January 28, 2017 00:52 IST2017-01-28T00:51:23+5:302017-01-28T00:52:01+5:30
लातूर हैदराबाद येथील संशोधन संस्थेने विकसित केलेल्या तुरीच्या आयसीटीएच २७४० वाणाचे बियाणे जिल्ह्यात साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप केले होते.

अतिपावसामुळे तूर पिकाचे नुकसान !
हरी मोकाशे लातूर
हैदराबाद येथील संशोधन संस्थेने विकसित केलेल्या तुरीच्या आयसीटीएच २७४० वाणाचे बियाणे जिल्ह्यात साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप केले होते. मात्र या पिकास केवळ फुलेच लगडली़ शेंगाच लागल्याच नाहीत़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून हैदराबादच्या संशोधन तज्ज्ञांनी पाहणी केली असून, नुकसानीस बियाणाचा दोष नसून, अतिपावसामुळे पीक आले नसल्याचा अहवाल दिला आहे.
केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली हैदराबाद येथे इक्रीसॅट ही बियाणे संशोधन संस्था आहे़ या संस्थेने गेल्या वर्षी तुरीचे आयसीटीएच २७४० हे वाण विकसित केले़ दरम्यान, हे वाण जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी कृषी विभागाकडे देण्यात आले़ कृषीच्या अधिकाऱ्यांनी तुरीचे चांगले उत्पन्न मिळणारे नवीन वाण उपलब्ध झाल्याचे सांगून त्याचे जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले़ शासनाकडून नवीन वाण आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी ते मिळविण्यासाठी धावपळ केली होती़ त्यामुळे खरीप हंगामाच्या कालावधीत या वाणाचा दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता़ दरम्यान, काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे हे तुरीचे पीक घेतले़ डिसेंबरमध्ये पीक काढणीला आले असतानाही केवळ फुलेच लगडली़ शेंगाच लागल्या नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली़
या वाणाच्या पीकक्षेत्राची पाहणी पथकांद्वारे करण्यात आली़ या पथकात हैदराबाद येथील इक्रीसॅट संशोधन केंद्रातील तीन तज्ज्ञ संशोधक, उपविभागीय कृषी अधिकारी आऱ टी़ मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ़ डिग्रसे यांचा समावेश होता़ या तज्ज्ञांनी आपला पाहणी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे गत आठवड्यात सादर केला असून तुरीला शेंगा न लगडण्याचे कारण हे अतिपावसाचे दिले आहे.