पीकविम्याची गुरुवार तर फळपीक विम्यासाठी बुधवारची अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST2021-07-14T04:05:37+5:302021-07-14T04:05:37+5:30
औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खरीप पीक आणि डाळिंब, सीताफळ पिकांचा विमा अधिकाधिक प्रमाणात काढावा. खरीप पिकांचा विमा भरण्याची मुदत १५ ...

पीकविम्याची गुरुवार तर फळपीक विम्यासाठी बुधवारची अंतिम मुदत
औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खरीप पीक आणि डाळिंब, सीताफळ पिकांचा विमा अधिकाधिक प्रमाणात काढावा. खरीप पिकांचा विमा भरण्याची मुदत १५ जुलै तर डाळिंब, सीताफळ फळ पिकांची विमा उतरवण्याची १४ जुलै अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी हा विमा अधिकाधिक काढावा यासाठी जिल्ह्यातील सीएससी केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत उघडी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेरणी न होणे, पिकांची उगवण न होणे, काढणीनंतर नुकसान होणे आदी बाबींवर विमा संरक्षण मिळते. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी आदी ठिकाणी विमा काढता येतो. त्यासाठी अर्जदाराकडे सातबारा, पेरणीचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तूर ५०० रुपये, बाजरी ४४०, मका ६००, सोयाबीन ९००, मूग ४००, उडीद ४००, कापूस दोन हजार २५०, खरीप कांदा तीन हजार २५० याप्रमाणे प्रतिहेक्टरी विमा हफ्ता आहे. विमा संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२६६०७०० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.