शहरात आजपासून प्रचाराचा झंझावात!

By Admin | Updated: November 18, 2016 00:58 IST2016-11-18T01:01:52+5:302016-11-18T00:58:47+5:30

जालना : शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा प्रचाराचा झंझावत सुरू होणार आहे.

A thunderstorm in the city today! | शहरात आजपासून प्रचाराचा झंझावात!

शहरात आजपासून प्रचाराचा झंझावात!

जालना : जिल्ह्यातील चारही नगर पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, जालन्यात गुरुवारी निवडणूक विभागातर्फे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा प्रचाराचा झंझावत सुरू होणार आहे.
जालना नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांना गुरुवारी निवडणूक चिन्हाचे अधिकृतरित्या वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या संगीता कैलास गोरंट्याल या अधिकृत उमेदवार असल्याने त्यांचे पक्षाचे पंजा हे चिन्ह कायम ठेवण्यात आले तर शकुंतला नरहर कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना सेना भाजपने पुरस्कृत केले आहे. कदम यांना गॅस सिलिंंडर हे चिन्ह देण्यात आले आहे. तर कुरेशी खातूनबी गणी यांना मेणबत्ती, खा. रहीमाबी मुक्तारखान सायकल, नंदा परमेश्वर पवार कपबशी, मनीषा राजेंद्र भोसले रेल्वे इंजिन, मो. सईदा बेगम असद कपाट, विद्या प्रताप लहाने बॅट, सुमन अंकुश शितोळे रोड रोलर, शेख रिजवाना अब्दुल खुद्दूस टेबल तर असमत सोहेल सिद्दीकी यांना पतंग हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे निवडणूक चिन्ह निश्चित असले तरी अपक्ष उमेदवारांचे चिन्ह नक्की नसल्याने प्रचारास त्यांनी सुरूवात केली नव्हती. आता ते झाल्याने नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही प्रचारासाठी जय्यत तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनाही ध्येय धोरणाबाबत व जाहीरनाम्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शुक्रवारपासून नगर परिषद निवडणुकीत राजकीय धुराळा उडणार असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने सभाही गाजणार आहेत. तसेच कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष भेटी-गाठी, छोटेखानी सभा आदींवरही उमेदवारांचा भर राहणार असल्याचे दिसून येत आहे. आगामी आठ दिवसांत राज्यस्तरावरील राजकीय नेते यांच्याही जिल्ह्यातील विविध ठिकाणी सभा होणार असून, यात ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A thunderstorm in the city today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.