इच्छुकांचा गलबला सुरु...

By Admin | Updated: August 13, 2014 00:22 IST2014-08-12T23:59:05+5:302014-08-13T00:22:52+5:30

परभणी- विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरु इच्छिणाऱ्यांचा गलबला आता सुरु झाला आहे.

The thundering of want started ... | इच्छुकांचा गलबला सुरु...

इच्छुकांचा गलबला सुरु...

परभणी- विधानसभा निवडणुकीची घोषणा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना या निवडणुकीच्या रणांगणात उतरु इच्छिणाऱ्यांचा गलबला आता सुरु झाला आहे. प्रस्थापित उमेदवारांना शह देण्यासाठी नवख्यांनीही कंबर कसली असल्याने या गलबल्याचा गोंगाट प्रस्थापितांची झोप उडविणारा ठरत असल्याची चर्चा जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे.
अभिमन्यू कांबळे ल्ल परभणी
मराठवाड्यात परभणी जिल्ह्याचे राजकारण भल्या-भल्यांना कळालेले नाही. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत वेगळे चित्र तर राज्य व देशपातळीवरील निवडणुकीत वेगळे चित्र येथे पहावयास मिळते.
निवडणुकीच्या एकाच व्यासपीठावर असणारी नेते मंडळी सभा संपल्यानंतर ज्यांच्यासाठी प्रचाराचा देखावा केला गेला, त्यांनाच पाडण्याकरीता व्यूहरचना आखत असल्याचा अनुभव सातत्याने परभणीकरांना आलेला आहे. असे असले तरी काही नेतेमंडळींची व्होट बँक कमी झालेली नाही. तर काही मंडळींची व्होट बँक काही केल्या वाढत नसल्याचे सातत्याने दिसून आले आहे. निवडणुकीच्या या रणांगणात अनेक दिग्गजांना नवख्यांनी मात दिल्याची उदाहरणे याच जिल्ह्यात पहावयास मिळाली. आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजण्याचे संकेत येऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना विविध राजकीय पक्षांमधील इच्छुकांचा गलबला सुरु झाला आहे.
विशेषत: नवख्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने प्रस्थापित उमेदवारांची झोप या गलबल्यामुळे उडू लागली आहे. ही स्थिती बहुतांश राजकीय पक्षांमध्ये पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी या संदर्भात पडद्यामागे घडामोडी होत आहेत. तर काही ठिकाणी पडद्यासमोर येऊन प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारी केली जात आहे.
शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीला आघाडी मिळाल्याने सेनेतील नेते मंडळी चांगलीच अस्वस्थ झाली आहे. सलग दोन वेळा निवडून आलेले बंडू जाधव आता खासदार झाल्याने त्यांचा वारस कोण होणार, याकडेही परभणीवासियांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रच निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आघाडीतील जागा वाटपानुसार काँग्रेसकडे परभणीची जागा आहे. येथून जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांना उमेदवारी मिळते की, आनंद भरोसे बाजी मारतात, याचीही उत्सुकता परभणीकरांना लागली आहे. काँग्रेस व शिवसेनेत येथे खरी लढत होणार असली तरी ऐनवेळी इतर पक्षाकडूनही तगडा उमेदवार येथून उभा राहू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज मागविणे सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया ११ ते २० आॅगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. पाथरी मतदारसंघातून पक्षाकडून सुरेश वरपूडकर, प्रेरणा वरपूडकर, राजेश विटेकर हे निवडणूक लढवू इच्छितात. असे असले तरी ऐेनवेळी येथून नवीन नावे ही समोर येऊ शकतात. गंगाखेडमधून मधुसूदन केंद्रे हे प्रमुख दावेदार आहेत.
काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी
परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी तब्बल २७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे, कुंडलिक नागरे, विखार अहेमद खान, आनंद भरोसे, भगवान वाघमारे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे या दिग्गजांचा समावेश आहे. जिंतूरमधून मात्र विद्यमान आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे आला आहे. गंगाखेड व पाथरी विधानसभा राष्ट्रवादीकडे असली तरी येथूनही अनुक्रमे चार व सहा इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मिळविण्याची खरी चुरस परभणीतूनच दिसून येणार आहे.
भाजपात चर्चाच सुरु
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी युतीतील प्रमुख पक्ष भाजपाकडे केवळ गंगाखेडची जागा आहे. येथून पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याचीच चर्चा सध्या जोरदारपणे सुरु आहे. विजयाचे गणित यशस्वी ठरविणारा उमेदवार येथे पक्षाला हवा आहे. येथून रत्नाकर गुट्टे, सुभाष कदम, गणेशराव रोकडे, विठ्ठलराव रबदडे हे इच्छुक आहेत.
मनसेचे इंजिन चालणार ?
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, नाशिक, पुण्यात करिष्मा दाखविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळीही राज्यभर स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पाथरीमधून माजी आ.हरिभाऊ लहाने, गंगाखेडमधून जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई हे इच्छुक आहेत. तर परभणी, जिंतूरमधूनही काही जण इच्छुक आहेत. परंतु, मनसेचे लक्ष मात्र पाथरी आणि गंगाखेडवरच राहणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पक्षाचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
रिपाइं, बसपाचीही तयारी
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाने गंगाखेडची जागा महायुतीच्या नेत्यांकडे मागितली आहे. तर रिपाइं गवई गटाने चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने नुकतीच पक्षाची बैठकही परभणीत झाली. बहुजन समाज पार्टीनेही एकला चलो चा नारा दिला असून हा पक्षही या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी करु लागला आहे. याशिवाय एमआयएम, समाजवादी पार्टी, माकप आदी पक्षही निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगून आहेत. या पक्षांचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. याशिवाय काही अपक्ष उमेदवारही गेल्या निवडणुकीप्रमाणे ऐेनवेळी मैदानात येऊ शकतात. ज्यामुळे निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलू शकते. असे आश्चर्यकारक उमेदवार यापूर्वी निवडणूक लढताना दिसून आले आहेत.
शिवसेनेतही उमेदवारीसाठी चुरस
परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी बरेचजण इच्छुक आहेत. त्यामध्ये डॉ.राहुल पाटील, संदीप भंडारी, गजानन देशमुख, गंगाप्रसाद आणेराव, अजीत वरपूडकर, सदाशिव देशमुख, अनिल डहाळे, राजू कापसे, प्रा.पंढरीनाथ धोंडगे, अतूल सरोदे आदींचा समावेश आहे. येथून उमेदवारी देताना खा.बंडू जाधव यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. खा.जाधव कोणाच्या पारड्यात मत टाकतात, यावरही पक्षाच्या विजयाची गणिते काही अंशी अवलंबून राहणार आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात पक्षाला अन्य दोन दिग्गज उमेदवारांच्या तुलनेत तगडा उमेदवार मिळणे कठीण आहे. तरीही येथून चांगल्या उमेदवाराचा शोध पक्षाकडून सुरु आहे. पाथरीमधून मीराताई रेंगे ह्या एकमेव उमेदवार आहेत.
नेहमीच राज्यपातळीवर चर्चिला जाणाऱ्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे आ. रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यातच लढत होणार आहे. या लढतीमध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण? व या उमेदवाराची भूमिका काय राहील, याच्यावरुनही बोर्डीकर- भांबळे लढत अवंलबून राहणार आहे. आ.मीराताई रेंगे ह्या जनतेतून निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकमेव महिला आमदार आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून पुन्हा एकदा आ.मीराताई रेंगे यांची उमेदवारी पक्की असल्याचे शिवसैनिकांचे मत आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण मैैदानात उतरेल, हे आज घडीला तरी सांगणे कठीण आहे. येथून मनसेकडून मात्र माजी आ.हरिभाऊ लहाने यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अपक्ष आ.सीताराम घनदाट यांच्या वर्चस्वाला भाजपाकडून आव्हान देण्याची तयारी रत्नाकर गुट्टे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे व अन्य उमेदवारांनी सुरु केली असून राष्ट्रवादीकडून मधुसूदन केंद्रे यांच्यासह अन्य काही इच्छुकांनी तयारी चालविली आहे. येथे मनसेचा उमेदवारही ऐनवेळी चित्र बदलू शकतो. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या प्रमुख पक्षांसह बसपा, मनसे, रिपाइं आदी पक्षांचे उमेदवारही नशीब अजमावू शकतात. तशी या राजकीय पक्षांकडून चाचपणीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची उत्सुकता संपूर्ण जिल्हावासियांना लागली आहे.

Web Title: The thundering of want started ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.