चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: April 13, 2015 00:47 IST2015-04-13T00:45:32+5:302015-04-13T00:47:52+5:30

उस्मानाबाद / परंडा : उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शिवाजी नगर भागात व आष्टा (ता़भूम) येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ


उस्मानाबाद / परंडा : उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शिवाजी नगर भागात व आष्टा (ता़भूम) येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़ दोन्ही ठिकाणी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह लाखो रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ तर आष्टा येथील एका महिलेला शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरामुळे दोन्ही गावासह परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, सांजा परिसरातील शिवाजी नगर भागात पूजा गंगाधर इंगळे या वास्तव्याला आहेत़ पूजा इंगळे यांच्या घराचा शनिवारी रात्री कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटातील ४५ हजार रूपयांचे ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले़ याबाबत पांडुरंग भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना भोसले हे करीत आहेत़
भूम तालुक्यातील आष्टा येथील जनार्धन तुळशीराम गिलबिले हे घराला कुलूप लावून कुुटुंबियांसह माळवदावर झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला़ आतील उतरंडीच्या डेऱ्यात ठेवलेले ७० हजार रूपये रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर माळवदावरील गिलबिले कुटुुंबिय खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला़ तसेच आष्टा येथीलच धोंडीबा सोपान जाधव यांच्या घरी अर्चना जाधव या दोन लहान मुलींसह झोपल्या होत्या़ तर दत्तात्रय जाधव हे पाहुण्यासोबत शाळेत झोपायला गेले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास सहा चोरट्यांनी दरवाजा नसलेल्या घराच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला़ चोरट्यांची चाहूल लागताच अर्चना जाधव यांना जाग आली़ त्यावेळी चोरट्यांनी जाधव यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील कर्णफुले, मंगळसूत्र असा दीड तोळ्याचा ऐवज, दोन मोबाईल व रोख ७०० रूपये चोरून नेले़ या घटनेने आष्टासह परिसरात खळबळ उडाली आहे़

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.