डॉक्टरांचेही घर फोडले चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: November 14, 2015 00:51 IST2015-11-14T00:15:43+5:302015-11-14T00:51:06+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ तीन ठिकाणी चोऱ्या करून

डॉक्टरांचेही घर फोडले चोरट्यांचा धुमाकूळ
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ तीन ठिकाणी चोऱ्या करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साधारणत: दोन लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सांजा रोड भागातील काका नगर परिसरात राहणारे सुलेमान रज्जाक निचलकर यांच्या पत्र्याच्या शेडचा पत्रा फाडून सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील ४५ हजार रूपये किंमतीचे ६० किलोचे दोन सुपारीचे पोते हातोहात लंपास केले़
शहरातील तांबरी विभागातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे राजकुमार हरिदास भोयटे हे सोमवारी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले होते़ तर त्यांच्या घरची मंडळी सणानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ आतील एक संगणक, तीन तोळे सोन्याचे दागिने, रोख १५०० रूपये, साड्या आदी १ लाख १६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत राजकुमार भोयटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)
नळदुर्ग : अज्ञात चोरट्यांनी परमीट रुमच्या चॅनलगेटचे कुलूप आत प्रवेश मिळवित रोख रक्कमेसह पावणेचार लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे घडली. याबाबत किरण त्रिंबक गंगणे यांनी नळदुर्ग पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळकोट येथे त्यांच्या मालकीचे बिअरबार परमीट रूम आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारच्या मध्यरात्री ते फोडून आतमध्ये प्रवेश करुन काऊंटरमध्ये ठेवलेले रोख ३ लाख, दिवसभराच्या गल्ल्याचे ४० ते ४५ हजार, चिल्लर नाणी ९ हजार व ३ तोळ्याच्या अंगठ्या असे एकंदरीत ३ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोउपनि पठाण हे करीत आहेत.
शहरातील महात्मा गांधी नगर भागात राहणारे डॉ़ मुकुंद तावरे यांचे घरही सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ डॉ़ तावरे यांच्या घरातील सोन्याची अंगठी, संगणकाचा माऊस, की-बोर्ड, चांदीचा रंगनाथ, देव्हाऱ्यासमोर ठेवलेले पैसे असा मुद्देमाल लंपास केला़
चोऱ्यांचे सत्र थांबेना
४मागील आठवड्यापासून जिल्ह्यात चोऱ्यांचे सुरू झालेले सत्र थांबण्याचे नाव घेत नाही़ येडशी, भूम तालुक्यातील ईट, वाशी तालुक्यातील तेरखेडा व उस्मानाबाद शहरात चोऱ्या झाल्या आहेत़ वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़