वाहनाचे हप्ते भरण्यासाठी ठगगिरी
By Admin | Updated: October 10, 2014 00:42 IST2014-10-10T00:15:24+5:302014-10-10T00:42:20+5:30
औरंगाबाद : ‘पैशांची गरज आहे, थोड्या वेळाने घरी पैसे परत आणून देतो,’ अशी थाप मारून एका वृद्धाला पाच हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या थापाड्याला अटक केली.

वाहनाचे हप्ते भरण्यासाठी ठगगिरी
औरंगाबाद : ‘मी तुमच्या शेजारच्याचा भाचा आहे, मला ओळखले नाही का, मला आता तातडीने पैशांची गरज आहे, थोड्या वेळाने घरी पैसे परत आणून देतो,’ अशी थाप मारून एका वृद्धाला पाच हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या थापाड्याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.
रवींद्र प्रभाकर तेली (२६, रा. सध्या टीव्ही सेंटर परिसर, मूळ मालोद, जळगाव), असे त्या थापाड्याचे नाव आहे. गाडीचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसले की, रस्त्याने एखाद्या वृद्ध, भोळ्याभाबड्या नागरिकाला पकडायचे आणि अशी थाप मारून पैसे काढायचे, हा रवींद्रचा उद्योगच असल्याचे तपासात पुढे आले.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवशंकर कॉलनीतील देवीदास शामराव मोहिते (७५) हे ६ मे रोजी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकावर आले. त्यावेळी आरोपी रवींद्र तेली याने त्यांना गाठले. ‘बाबा मला ओळखले का, मी तुमच्या शेजारच्यांचा भाचा आहे,’ असे तो म्हणाला. मोहिते यांनी ‘आमच्या शेजारी राहणाऱ्या दीपक प्रोव्हिजनवाल्यांचा भाचा का तू’ असे विचारताच रवींद्रने हो हो, त्यांचाच भाचा आहे, असे सांगितले आणि मी सतत त्यांच्याकडे येतो, तुम्हाला अनेकदा पाहिले तेथे, असे तो म्हणाला. मग रवींद्रने इकडच्या तिकडच्या गप्पा मारून हळूच ‘मी खूप अडचणीत सापडलो आहे. मला तातडीने पाच हजार रुपये पाहिजेत, तुमच्याकडे असतील तर द्या मी सकाळीच घरी परत आणून देतो,’ असे तो म्हणाला. मोहिते यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी खिशातून पाच हजार रुपये काढले आणि त्याला दिले.
घरी गेल्यानंतर मोहिते यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक प्रोव्हिजनवाल्याला ‘तुमचा भाचा भेटला होता. पैशांची गरज होती, मी त्याला पाच हजार रुपये दिले,’ असे सांगितले. माझा असा कुणी भाचाच नाही, असे शेजाऱ्याने सांगितले. तेव्हा ‘त्या’ भामट्याने थाप मारून आपल्याला गंडविले, असे मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून या फसवणूकप्रकरणी तक्रार दिली होती. जमादार रमाकांत पटारे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता.
मोहिते यांना गंडविणाऱ्या तरुणाचा वर्णनावरून पोलिसांनी शोध सुरू केला होता.
आरोपी रवींद्र बुधवारी पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकावर अशाच एखाद्या वृद्ध- भोळ्याभाबड्याला गंडा घालण्याच्या इराद्याने आला. योगायोगाने तेथे तैनात असलेले पोलीस जमादार रमाकांत पटारे, नरसिंग पवार यांच्या तो नजरेस पडला. वृद्धाला काही दिवसांपूर्वी गंडविणाऱ्या आरोपीचे अन् या तरुणाचे वर्णन सारखेच असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडले.
नंतर मोहिते यांना बोलावून घेण्यात आले. पकडलेल्या रवींद्रला पाहताच मोहिते यांनी त्याला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी मोहिते यांची फिर्याद घेऊन रवींद्रला अटक केली.
आरोपी रवींद्र एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी दुचाकी खरेदी केली आहे. दुचाकीचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसले की, मी अशा पद्धतीने वृद्ध, भोळ्याभाबड्यांना थाप मारून गंडा घालतो आणि आलेल्या पैशातून हप्ता भरतो, अशी कबुली रवींद्रने दिली.