छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणातून एका टवाळखोराने भर दिवसा हातात तलवार घेऊन एकाचा पाठलाग करत जबर वार केले. राजाबाजारमध्ये सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता रस्त्यावर घडलेल्या घटनेने रहिवाशांचा थरकाप उडाला होता. पोलिसांचा धाक संपलाय का, असा गंभीर प्रश्नही उपस्थित झाला.
शेख रईस शेख अनीस (२२, रा. शहागंज) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल पटेल बशीर पटेल (२५, रा. शहाबाजार) हे फळविक्रेते आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी त्यांचा मित्र रईसला मस्करीत शिवीगाळ केली. त्यानंतर रईस तेथून चालला गेला. मात्र, काही मिनिटांतच तो हातात तलवार घेऊन परतला. त्याच्या भीतीने साेहेलने पळ काढला. तेव्हा रईस शहागंंज ते संस्थान गणपती मंदिराच्या दिशेने उघडी तलवार घेऊन पाठलाग करत सुटला. त्याने सोहेलवर वार केले. भर दिवसा रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक घाबरून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रईसला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.