बजाजनगरात दहीहंडीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:49 IST2019-08-25T22:48:52+5:302019-08-25T22:49:01+5:30
वाळूज महानगर परिसरात शनिवारी (दि.२४) श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

बजाजनगरात दहीहंडीचा थरार
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात शनिवारी (दि.२४) श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ठिकठिकाणी बाळ गोपाळांनी दहीहंडी फोडून आपला आनंद साजरा केला. बजाजनगर येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात मात्र गोविंदा पथकाच्या थरांचा उत्कंठा लावणारा थरार पहायला मिळाला. यावेळी डीजेच्या तालावर तरुणाईने जल्लोष करीत नृत्याचा आनंद घेतला.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बिरजू भय्या युवा मंचतर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील सावरकर चौकात बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी शहरासह परिसरातील गोविदांच्या पथकाचे जत्थेच्या जत्थे गोविंदा आलारे चा जयषोष करित येत होते.
सुरुवातीला स्व. अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचा मारा सुरु असतानाही गोविंदाच्या पथकांनी थरावर थर चढवत आपले कसब दाखवित होते.
अखेर शहरातील जयराणा क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाने पाच थर चढवून दहीहंडी फोडत ५१ हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले. दहीहंडी पहाण्यासाठी परिसरातील महिला-पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. यावेळी तरुणाईने डीजेच्या तलावर अक्षरश: जल्लोषात थिरकताना दिसून आली.