माथेफिरूंनी पेटविली तीन वाहने अन् रसवंती
By Admin | Updated: June 12, 2014 01:35 IST2014-06-12T01:23:58+5:302014-06-12T01:35:08+5:30
औरंगाबाद : बुधवारी रात्री सिडको एन-९ येथील रंजनवन हौसिंग सोसायटीमधील एक मोटारसायकल, दोन कार आणि एक रसवंती पेटवून देण्यात आली

माथेफिरूंनी पेटविली तीन वाहने अन् रसवंती
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी, बजाजनगर या वसाहतीत वाहने जाळण्याच्या घटना सतत घडत असताना बुधवारी रात्री सिडको एन-९ येथील रंजनवन हौसिंग सोसायटीमधील एक मोटारसायकल, दोन कार आणि एक रसवंती पेटवून देण्यात आली. या घटनेत मोटारसायकल जळून खाक झाली, तर अन्य वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
सिडकोतील रंजनवन हौसिंग सोसायटीतील रहिवासी गणेश अरविंदराव व्यवहारे यांनी त्यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्रमांक जीजे-१५ एलएल-३७६२) मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरासमोर उभी करून ठेवली. रात्री सव्वावाजेच्या सुमारास मास्क घालून आलेल्या समाजकंटकांच्या टोळक्याने त्यांच्या मोटारसायकलचे सीट फाडले आणि आग लावली.
गणेश यांनी घटनेच्या काही तास आधीच २०० रुपयांचे पेट्रोल भरलेले होते. त्यामुळे इंजिनला पेट्रोलचा पुरवठा करणारी नळी काही क्षणात जळून खाक झाली आणि टाकीतील पेट्रोलने पेट घेतला. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने गणेश आणि त्याचे आई-वडील जागे झाले. ते घराबाहेर आले तेव्हा त्यांची मोटारसायकल पेटलेली दिसली. त्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोन्ही चाक, सीटसह संपूर्ण गाडी जळून खाक झाली.
आरोपींनी याच सोसायटीत राहणाऱ्या डॉ. हरिश्चंद्र झिंजुर्डे पाटील यांच्या स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-२० बीएन-२६९६) ला लाग लावली. गाडीने लवकर पेट घ्यावा यासाठी त्यांनी कारच्या पेट्रोल टाकीजवळील टायरला आग लावल्यामुळे मडगार्डने पेट घेतला. झिंजुर्डे यांच्या घराशेजारी राहणारे तिळवे कुटुंब हे गच्चीवर झोपलेले होते. त्यांनी पाणी आणून आग विझविण्यास सुरुवात केली.
डॉ. झिंजुर्डे यांच्या गल्लीतच राहणाऱ्या नारायण कुलकर्णी यांची ह्युंदाई कारही पेटविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत त्यांच्या चाक आणि मडगार्ड पेटवून देण्यात आले. ही आग तातडीने विझविण्यात आली. आरोपींनी एन-९ येथील धनवई हॉस्पिटलसमोरील एक रसवंती यंत्राला गुंडाळण्यात आलेल्या गोणपाटासह पेटवून दिली. ही आगही लोकांनी विझविली. वाळूज महानगरमध्ये रात्री उशीरा वाहने पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. या गुन्हेगारांचा शोध लागू शकलेला नाही.
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.