अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी तीन हजार प्रवेश क्षमता
By Admin | Updated: July 15, 2016 01:06 IST2016-07-15T00:35:49+5:302016-07-15T01:06:35+5:30
औरंगाबाद : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी औरंगाबाद शहरात सुमारे तीन हजार जागा असून, या जागांवर प्

अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी तीन हजार प्रवेश क्षमता
औरंगाबाद : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी औरंगाबाद शहरात सुमारे तीन हजार जागा असून, या जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १४ ते २३ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीबरोबरच तंत्रशिक्षण विभागाने नेमून दिलेल्या सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी स्वत: जाऊन अर्ज निश्चिती करायची आहे. २६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी २७ ते २९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ३० जुलै रोजी जाहीर होईल. सर्व तंत्रनिकेतन पदविका केलेले विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेस पात्र असतील. मागास प्रवर्गासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण आणि खुल्या वर्गासाठी ४५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा नवीन बदल स्वीकारण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे फ्लोट, स्लाईड आणि फ्रीज पद्धतीचा अवलंब थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी करण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतही अभियांत्रिकी प्रथम वर्षाप्रमाणेच तीनशे विकल्प देण्याची सुविधा असेल. तीन फेऱ्यांसाठी एकच विकल्प अर्ज भरायचा आहे. चौथ्या फेरीपूर्वी नव्याने विकल्प अर्ज भरण्याची सुविधादेखील असेल. राज्यात एकूण १८७ व मराठवाड्यात एकूण ३० सुविधा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. राज्यात ३० हजारांहून अधिक तर औरंगाबादमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे.