लाचप्रकरणी तिघांचेच निलंबन
By Admin | Updated: July 11, 2016 01:13 IST2016-07-11T01:03:06+5:302016-07-11T01:13:21+5:30
औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

लाचप्रकरणी तिघांचेच निलंबन
औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाच्या बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास परवानगी देण्याची प्रकरणे मात्र शासनस्तरावर प्रलंबित आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सात जणांविरुद्ध गेल्या दोन वर्षांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश होता, जिल्हा प्रशासनाने यापैकी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करून दोघांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यास परवानगी दिली आहे. औरंगाबाद तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील लिपिक गंगाधर गायकवाड यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २४ जुलै २०१५ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशासनाने त्यांना यावर्षी ३ मार्च रोजी निलंबित करून त्याच दिवशी खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. बनोटी (ता. सोयगाव) सज्जाचे तलाठी भगतसिंग पवार यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात १२ आॅगस्ट २०१४ रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांच्यावर २३ मार्च २०१५ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली तसेच १० मार्च २०१६ रोजी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. बोडखा (ता. खुलताबाद) सज्जाचे तलाठी शेख अय्युब पापामियाँ यांच्याविरुद्ध २१ जानेवारी रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १४ मार्च रोजी निलंबित करण्यात आले. अय्युब यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. वैजापूरच्या तहसील कार्यालयातील लिपिक दिलीपसिंह पवार यांच्याविरुद्ध १२ सप्टेंबर २०१४ रोजी वैजापूर ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
अडकुणे, पडघन यांच्यावर कारवाई नाही
औरंगाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी २०१३ रोजी लाचेचा गुन्हा दाखल झाला होता.
अडकुणे यांना निलंबित न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सध्या ते पालघर येथे उपजिल्हाधिकारी आहेत. वैजापूरचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत पडघन यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पडघन यांनादेखील महसूल खात्याने निलंबित केले नाही. या दोघांविरुद्ध खटला दाखल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.
तलाठ्यांचे प्रस्ताव केले परत
लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या तलाठ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यास परवानगी मागणारे प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते. तलाठी संवर्गातील कर्मचारी हे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करीत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे गरजेचे होते. टाकळी कदीम (ता. गंगापूर) येथील तत्कालीन तलाठी इंद्रभान सोनवणे यांच्याविरुद्ध दौलताबाद ठाण्यात ३१ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांच्याबाबतचा प्रस्ताव वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणे गरजेचे होते. त्यामुळे हा प्रस्ताव लाचलुचपत विभागाकडे परत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.