मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:39 IST2016-09-28T00:13:23+5:302016-09-28T00:39:52+5:30
औरंगाबाद : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा
औरंगाबाद : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. बसस्थानकात मंगळवारी ‘एटीएस’ आणि ‘क्यूआरटी’ पथकाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या त्रुटींविषयी पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये सुधारणा करण्याची कडक सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.
२१ जून रोजी मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसमध्ये पार्सलचा स्फोट झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारास सुरक्षेसंदर्भात सूचना करण्यात आल्या; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मंगळवारी झालेल्या पाहणीत दिसले. पार्सल तपासणीसाठी स्कॅनरसारखी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पार्सल पूर्णपणे तपासून घेणे, स्कॅनर घेणे, कार्यरत कर्मचाऱ्यांची पडताळणी करून नेमणूक करणे इ. सूचना करण्यात आल्या.
बसस्थानक, आगार परिसरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; परंतु त्यांची संख्या अपुरी आहे. शिवाय काही कॅमेरे योग्य दिशेत बसविण्यात आलेले नाहीत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर फेरीवाले, हातगाड्या उभ्या केल्या जातात. यासंदर्भात काळजी घेण्याची सूचना करण्यात आली. रात्रीच्या वेळी आगारात बसेस उभ्या केल्या जातात. अशा वेळी या बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सर्वाधिक खबरदारी घ्यावी. सुरक्षारक्षक अपुरे असून जे आहेत त्यांनी दक्ष राहावे, असे पथकाकडून सांगण्यात आले. यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या असून त्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.