राशनसाठी चढावी लागते तीन मजली इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:52+5:302021-02-05T04:09:52+5:30
बनकिन्होळा : बनकिन्होळा गावात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी वयोवृध्दांसह लाभधारकांना चक्क ग्रामपंचायतीच्या ...

राशनसाठी चढावी लागते तीन मजली इमारत
बनकिन्होळा : बनकिन्होळा गावात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी वयोवृध्दांसह लाभधारकांना चक्क ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतरही नेटवर्कची बोंबाबोंब असल्याने लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.
राशनकार्डधारकाचे आधार लिंक केल्याशिवाय राशन धान्य देता येत नसल्याने दुकानदारास ई-पॉस मशीन व कार्डधारकांना घेऊन ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. रेंजअभावी वयोवृद्ध लाभधारकांना तासन्तास लाईन लावून ताटकळत बसावे लागत आहेत. कार्डधारकाचा अंगठा जोपर्यंत प्रेस होत नाही. तोपर्यंत त्यांना धान्य दिले जात नाही. एकीकडे शासन डिजिटल इंडियाच्या गप्पा मारते. परंतु आजही ग्रामीण भागात डिजिटल सुविधा पोहचलीच नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावातील ही परिस्थिती असेल तर खेडोपाडी काय अवस्था असावी याची कल्पनाच न केलेली बरे. या मूलभूत समस्येकडे या भागातील लोकप्रतिनिधी तरी लक्ष देतील का, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
----------
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही दयनीय अवस्था
बाभुळगाव (बु), वरखेडी, भायगाव, बनकिन्होळा, गेवराई सेमी गावांमध्ये मोबाइल नेटवर्क मिळत नाही. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बेरोजगारांना तालुक्यांचा रस्ता धरावा लागतो. तर विद्यार्थ्याना ऑनलाइन अभ्यासाकरिता घराच्या छतावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही ही गावे दूरसंचार क्रांतीपासून कोसो दूर आहेत. रेंज नसल्याने संकटसमयी कोणाशी संपर्कदेखील करता येत नाही.
--------------
फोटो कॅप्शन : राशन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी जावे लागते. मात्र, नेटवर्क मिळत नसल्यामुळे त्यांना ताटकळत थांबावे लागते.