काळाने झडप घातल्याने एकत्र वाढलेल्या तीन बहीण-भावांची झाली ताटातूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:28+5:302020-12-17T04:26:28+5:30
औरंगाबाद : वडीगोद्री फाट्यावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सिडको एन-५ मधील प्रियदर्शिनी कॉलनीतील शिव पुरुषोत्तम अग्रवाल (वय १७) ...

काळाने झडप घातल्याने एकत्र वाढलेल्या तीन बहीण-भावांची झाली ताटातूट
औरंगाबाद : वडीगोद्री फाट्यावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सिडको एन-५ मधील प्रियदर्शिनी कॉलनीतील शिव पुरुषोत्तम अग्रवाल (वय १७) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन बहीण-भावंडांची या अपघाताने ताटातूट केली.
सिडको एन- ५ येथील पुरुषोत्तम अग्रवाल यांची शिव आणि ओम जुळी मुले. त्यांचा भाऊ जगदीश अग्रवाल यांचा मुलगा अनंत यांच्या वयात केवळ १५ दिवसांचे अंतर. ते बालपणापासून एकाच शाळेत शिकत होते. एकाच रिक्षाने ते शाळेत जात आणि एकत्र डबा खात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिन्ही भावंडांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) होण्याचा निर्णय घेतला. देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकत्र शिकवणी वर्गाला ते जात. ओम आणि शिव अन्य मित्रांसोबत शनिवारी पहाटे कार घेऊन फिरायला गेले. नेहमी ते शहरापासून केवळ १५ ते २० कि.मी. अंतरावर जाऊन येत. शनिवारी ते गेवराई (जिल्हा बीड) पर्यंत गेले. तेथून परत येत असताना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वडीगोद्री फाट्यावर त्यांच्या कारला मागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या शिवला गंभीर दुखापत झाली आणि तो मरण पावला. या घटनेने ओम, शिव आणि चुलतभाऊ अनंतची ताटातूट केली. समोरच्या सीटवर बसलेल्या ओमसमोर हा अपघात झाल्याने त्याला आणि त्याच्या सोबतच्या अन्य मित्रांना मोठा धक्का बसला. शिवच्या मागे आई-वडील, भाऊ ओम, अनंत, बहीण पायल, चैताली, काका, काकू, आजी, आजोबा असा परिवार आहे.
=============
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
सिडको एन-६ मधील मध्यवर्ती जकात नाक्याजवळील स्मशानभूमीत शिववर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन मित्र आणि नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले होते.