तीन वाळूघाट सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:47 IST2017-06-09T00:44:40+5:302017-06-09T00:47:49+5:30
नांदेड : वाळू उत्खननाचा कोणताही लेखाजोखा न ठेवता अमाप वाळू उपसा सुरू असलेले देगलूर तालुक्यातील तीन वाळू घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़

तीन वाळूघाट सील
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वाळू उत्खननाचा कोणताही लेखाजोखा न ठेवता अमाप वाळू उपसा सुरू असलेले देगलूर तालुक्यातील तीन वाळू घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ जिल्ह्यातील इतर वाळूघाटांवरही कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे़ या सर्व घाटांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़
देगलूर तालुक्यातील शेकापूर आणि सांगवी उमर येथील वाळू घाटांची मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी १२ मे रोजी संयुक्त पाहणी केली होती़ या पाहणीदरम्यान लिलावधारक ठेकेदाराने तपासणी अधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता अभिलेखेही तपासणीसाठी सादर केले नाहीत़ या तपासणीत उत्खनन केलेल्या वाळूची, वाळू खरेदी करणाऱ्याची माहिती तसेच मासिक विवरणही सादर केले नाही़ या वाळूघाटांवर परवानगी दिलेल्या सीमा निश्चित करण्यासाठी उभारलेले खांबही ठेकेदाराने काढून दिवसरात्र वाळू उपसा सुरू ठेवला होता़ वाळू वाहतूक व विक्रीचे कोणतेही कागदपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्याने हे रेतीघाट तत्काळ बंद करण्याची गरज तपासणी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती़ हाच प्रकार २६ मे रोजी केलेल्या शेवाळा येथील वाळूघाटाबाबतही घडला़ येथील ठेकेदारानेही कोणतेही कागदपत्र तपासणी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले नाही़ सांगवी उमर आणि शेकापूर वाळूघाटावर परवानगीपेक्षा अधिक वाळूचे उत्खनन झाल्याने हे दोन्हीही वाळूघाट कायमस्वरूपी बंद करण्याची गरज असल्याची शिफारश देगलूरचे तहसीलदार माधव किरवले यांनी केली होती़
देगलूरचे तहसीलदार किरवले आणि मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तपासणी अहवालातील शिफारशीनंतर जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी शेवाळा, सांगवी उमर आणि शेकापूर येथील वाळूघाटाची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून मोजणी अहवाल कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांना दिले आहेत़ हा अहवाल सादर होईपर्यंत शेवाळा वाळूघाट बंद करण्याचे आदेशीत केले आहे़ तीन वाळूघाटांच्या लिलावातून जवळपास ३ कोटींचा महसूल मिळाला होता़