वाळूचे तीन टिप्पर जप्त
By Admin | Updated: April 23, 2015 00:45 IST2015-04-23T00:39:44+5:302015-04-23T00:45:24+5:30
जालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असून त्यानिमित्त जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयोसंबंधी कामांच्या पाहणीसाठी जात असताना

वाळूचे तीन टिप्पर जप्त
जालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असून त्यानिमित्त जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयोसंबंधी कामांच्या पाहणीसाठी जात असताना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना २२ एप्रिल रोजी विविध ठिकाणी तीन वाळूचा अवैध उपसा करणारे टिप्पर आढळून आले. हे तिन्ही वाहने त्यांनी पकडून संबंधित तहसील कार्यालयाच्या स्वाधीन केले आहेत.
अंबड तालुक्यातील पारनेर येथे जाताना जिल्हाधिकारी नायक यांना एम.एच.डी-६३७२ या क्रमांकाचे वाहन वाळूची वाहतूक करताना आढळले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपले वाहन थांबवून टिप्पर चालकास रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली असता ती नव्हती. संबंधित वाहनचालकाचा परवाना व कागदपत्रे तात्काळ घेऊन टिप्पर जप्त केले. सदरील टिप्पर आरटीओ कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश अंबड तहसीलदारांना दिले.
या पाठोपाठ रामनगर व परतूर येथेही प्रत्येकी एक वाळूचे टिप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सदरील वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ अंबड व घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी जिल्हाधिकारी नायक यांना सांगितले. अंबड तालुक्यातील हादगाव आणि पारनेर तसेच घनसावंगी तालुक्यातील बेलगाव हातडी येथील जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयो पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. घनसावंगी नगर पंचायतीमध्ये अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी नरेगाच्या कामामध्ये सुधारणा, मजुरांना पाणी पुरविणे, आधारकार्ड जागेवरच तात्काळ काढणे, मजुरांना शेड उभारणी व योग्य त्या सोयी तालुका प्रशासनाने जास्तीत जास्त उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी या दौऱ्यात केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, घनसावंगी व अंबड येथील गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
४यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.