खुनाच्या संशयावरून तीन परप्रांतीय ताब्यात
By Admin | Updated: July 8, 2014 00:37 IST2014-07-07T23:56:27+5:302014-07-08T00:37:38+5:30
हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला

खुनाच्या संशयावरून तीन परप्रांतीय ताब्यात
हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला असून या प्रकरणी सोमवारी दुपारी तीन परप्रांतियांना हिंगोलीत ताब्यात घेण्यात आले. त्यांना बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर सिटीकर यांनी दिली.
हिंगोली शहरातील बळसोंड भागात सोमवारी दुपारी सापळा रचून स्थागुशाच्या पथकाने कंटेनर चालक करणसिंग धरमपाल कुलहरी (वय ४० रा. खेचोली, ता. बुहाणा, जि. झुंझुनू, राजस्थान), विकासकुमार श्रीगुटाराम बाहेल (वय ३५, रा. गवळीजाट, ता. नारनौर, जि. महेंद्रगड हरियाणा), सुनील रामजीलाल शर्मा (३८,रा. खेचोली ता. बुहाणा जि. झुंझुनू राजस्थान ) या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. ते सर्वजण दोन कंटेनरमध्ये सिमेंटचे मिक्श्चर घेऊन दिल्लीहून हैदराबादकडे निघाले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकास सैतास कुलेहरी (२५, रा. खेचोली ता. बुहाणा जि. झुंझुनू राजस्थान) हा युवक अचानक बेपत्ता झाल्याची माहिती हिंगोली पोलिसांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सोबतचे तिघेजण आपल्या कंटेनरसह पुढे निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश बुलडाणा पोलिसांकडून मिळाल्याने हिंगोलीत ही कारवाई करण्यात आली.
अचानक बेपत्ता झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी कळवले असून हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हिंगोलीत पकडलेल्या तिघांकडून महत्वाची माहिती मिळू शकेल, असेही पोनि सिटीकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)