चौकशीसाठी तीन जण ताब्यात
By Admin | Updated: July 10, 2014 00:42 IST2014-07-10T00:08:42+5:302014-07-10T00:42:46+5:30
पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी अद्यापपर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे़

चौकशीसाठी तीन जण ताब्यात
पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी अद्यापपर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे़ ९ जुलै रोजी आणखी तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे़ तर या गुंतवणूकीतून खरेदी करण्यात आलेल्या तीन मोटारगाड्याही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक पाथरीत आहे़
पीएमडी कंपनीमधून गुंतवणूकदार ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून कंपनीचा मुख्य मालक मुंजाजी डुकरे आणि संचालक कृष्णा आबूज हे दोघे जण दोन महिन्यांपूर्वी पाथरी येथून कंपनीचे कार्यालय बंद करून आणि गोळा केलेली माया घेऊन पसार झाले होते़ या प्रकरणी २५ जून रोजी सर्व प्रथम पाथरीत गुन्हा दाखल झाला़ गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार ग्राहकांनी पाथरीकडे धाव घेतली़ परभणी जिल्ह्यासोबतच पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यातील ग्राहकही फसवणूक झाली म्हणून आता पुढे येऊ लागले आहेत़
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पाथरीच्या स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला होता़ पोलिसांनी नाथ्रा येथील कंपनीच्या दोन संचालकांना अटक करून त्यांच्या ताब्यातील सोळा लाख रुपयांची मोटार गाडी ही जप्त केली़ त्या आरोपींना नंतर न्यायालयाने जामीन दिला़ फरार झालेले कंपनीचे मुख्य मालक मुंजाजी डुकरे आणि कृष्णा आबूज हे दोन आरोपी ५ जुलै रोजी अचानक पाथरी पोलिसांना शरण आले़ यावेळी या दोन आरोपींना चार दिवसांची कोठडी मिळाली होती़ त्यानंतर हा तपास परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला़ या दोन्ही आरोपींना ११ दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तपासाला आता गती मिळाली आहे़ ८ आणि ९ जुलै या दोन दिवसांत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी अधिक तपास केला असता कंपनीसोबत गुंतवणूकदार ग्राहकांना एजंट आणि दलाल म्हणून काम करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी ९ जुलै रोजी ताब्यात घेतले आहे़ तसेच कंपनीच्या संबंधात असणाऱ्या तिघांकडील मोटार गाड्याही जप्त करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकरणी तपास करणारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विवेक मुगळीकर यांनी दिली़ दरम्यान, संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणी त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (वार्ताहर)
दहा लाख रुपये किंमतीची गाडी ताब्यात
पीएमडी कंपनीशी सलग्न असणाऱ्या लोकांकडील मोटार गाड्या ताब्यात घेण्यासाठी चौकशी सुरू असताना मंठा येथील मल्लिकार्जुन त्र्यंबक महानोरकर यांच्याकडील दहा लाख रुपये किंमतीची डस्टर गाडी तपासणी पथकाने ताब्यात घेतली आहे़ विशेष म्हणजे चार महिन्यापूर्वी खरेदी केलेल्या या गाडीची अद्यापही पासिंग करण्यात आली नव्हती़ तर या घटनेत ताब्यात घेतलेले संशयित आरोपी साक्षीदार होणार असल्याची चर्चा आहे़
मालमत्तेची चौकशी होणार
गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणावर आहे़ ही मालमत्ता मुंजाजी डुकरे याने स्वत:च्या नातेवाईकांच्या नावे केलेली आहे़ यामुळे खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेचीही चौकशी होणार असल्याचे निष्पन्न झाले आहे़
पाथरीतून एजंट झाले गायब
पीएमडी कंपनीमध्ये गुंतवणूकदार ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या कंपनीला अनाधिकृतरित्या एजंट म्हणून सहकार्य करणाऱ्या अनेक जणांवर कारवाई होणार असल्याचे दिसत असल्याने कंपनीच्या सलग्न एजंट पाथरीतून फरार झाले आहेत तर मुंजाजी डुकरे याच्यासोबत यापूर्वी इतर कंपन्यामध्ये काम करणाऱ्या काही जणांचीही चौकशी होणार असल्याने या साखळीतील सर्वच जण आता फरार झाले आहेत़