छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील एका पेट्रोलपंपावर लुटमार करून धारदार, घातक शस्त्रांसह चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत दरोडा व लुटमारीसाठी रेकी करत फिरणाऱ्या तीन घातक गुन्हेगारांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तिघांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
गजानन माणिक साळुंके (२०), नीलेश बबनराव लोखंडे (२७, दोघेही रा. हनुमाननगर), अनुज सौरभ साबळे (२०, रा. भारतनगर) यांना अटक करण्यात आली, तर त्यांचे साथीदार अल्ताफ शेख, मनोज कांबळे हे गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी ठरले. सोमवारी रात्री एमआयडीसी सिडकोचे सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अंमलदार हैदर शेख, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, संतोष सोनवणे, गणेश डोईफोडे औद्योगिक वसाहतीत गस्त घालत होते. या वेळी सपना मॅट परिसरात सदर गुन्हेगार संशयास्पदरीत्या हालचाल करताना दिसले. पथकाने त्यांचा पाठलाग करताच एका दुचाकीवरील अल्ताफ व मनोज सुसाट पसार झाले, तर उर्वरित तिघांच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
रात्री ९ वाजता मोबाइल हिसकावलाया टोळीने बीड बायपासवर चालत्या दुचाकीवरून एका पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला होता. त्यानंतर ते चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लुटमार, दरोड्यासाठी सावज शोधत होते. आठ दिवसांपूर्वी याच टोळीने पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याच्या खिशातून रोख रक्कम लुटली होती. यातील गजाननवर पुंडलिकनगर ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शस्त्र पाहून पोलिसही चक्रावलेसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद न होण्यासाठी दरोडेखोरांनी संपूर्ण दुचाकी चिखलाने माखून ठेवल्या होत्या. त्यांच्याकडे धारदार लांब कोयता, चाकू, मिरची पूड, दोरी व अत्यंत घातक असे वाघनखासारखे हत्यार पाहून क्षणभर पोलिसही चक्रावून गेले. त्यांच्या ताब्यातून लुटलेले चार मोबाइलही पोलिसांनी जप्त केले.