तरुणाचा खून करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:17+5:302021-01-16T04:05:17+5:30

औरंगाबाद : डोळे वटारून पाहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात समीर खान सिकंदर खान (२८, रा. आसेफिया कॉलनी) ...

The three murderers of the youth have been arrested by the police | तरुणाचा खून करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

तरुणाचा खून करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : डोळे वटारून पाहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात समीर खान सिकंदर खान (२८, रा. आसेफिया कॉलनी) याचा चाकू भोसकून खून करून तीन संशयित आरोपी घरी जाऊन झोपले होते. या मारेकऱ्यांची ओळख पटताच शुक्रवारी पहाटे वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चिराग राजपाल बिडलॉन (रा. गांधीनगर) आणि दोन अल्पवयीन मुलांचा (विधि संघर्षग्रस्त बालक) यात समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी अजबनगर परिसरात श्वानाला दुचाकीला बांधून फरपटत नेल्याच्या आरोपावरून क्रांती चौक पोलिसांनी चिरागला अटक केली होती.

समीर खान आणि त्याचा मित्र मोहम्मद आदिल मोहम्मद आरेफ (२८,रा. चिश्तिया कॉलनी) हे बुलेटने टाऊन हॉल येथून बिअर पिण्यासाठी पिया मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा तेथे चिराग बिडलॉन त्याच्या दोन साथीदारांसह उभा होता. यावेळी डोळे वटारून काय पाहतो, असे म्हणून चिरागसोबतच्या एकाने समीरला शिवीगाळ केली. समीरचा मित्र मोहम्मद आदिल त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्याच्या कानाखाली मारून बाजूला लोटले. समीर पुढे येताच आरोपींनी समीरला पकडून मांडीत चाकू खुपसून त्याचा खून केला. अवघ्या ४० ते ५० सेकंदात समीरचा खून करून आरोपी मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून पळून गेले होते. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे आदिलच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

चौकट

अवघ्या सहा तासांत संशयित पकडले

गांधीनगरच्या तरुणांनी हा खून केल्याची माहिती उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांना मिळाली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि आरोपींनी वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून गाडीमालकापर्यंत पोलीस पोहोचले. तेव्हा त्यांनी दुचाकी विकल्याचे मात्र अद्याप दुचाकी त्यांच्याच नावे असल्याचे सांगितले. खरेदीदाराला गाठले असता त्यानेही दुचाकी गांधीनगरातील मित्राला वापरण्यास दिल्याचे सांगितले आणि त्याचे घर दाखवले. पोलीस आरोपीच्या घरी गेले तेव्हा तो गाढ झोपेत होता. अन्य दोन आरोपींनाही पोलिसांनी झोपेतून उठवून ताब्यात घेतले.

======================

समीरविरुद्ध १५ गुन्हे, तडीपार

मयत समीर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध गांजा विक्रीचे दोन गुन्हे, विनयभंग करणे, अपहरण करणे, घरात घुसून मारहाण करणे, शस्राने दुखापत करणे, धनादेश अनादर करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये त्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी तडीपार केले होते. २०१९ मध्ये शस्राने मारहाणीचा गुन्हा त्याच्यावर बेगमपुरा ठाण्यात दाखल झाला होता.

Web Title: The three murderers of the youth have been arrested by the police