जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आणखी तीन संशयित रूग्ण
By Admin | Updated: February 20, 2015 00:07 IST2015-02-20T00:04:59+5:302015-02-20T00:07:34+5:30
उस्मानाबाद : राज्यभर पाय पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ आजाराचे दोन दिवसांत तीन संशयीत रूग्ण आढळून आले आहेत़ यात एका महिलेने स्वत:हून तपासणी केली असून

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आणखी तीन संशयित रूग्ण
उस्मानाबाद : राज्यभर पाय पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ आजाराचे दोन दिवसांत तीन संशयीत रूग्ण आढळून आले आहेत़ यात एका महिलेने स्वत:हून तपासणी केली असून, एक महिला जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल झाली आहे़ तर शहरातील एका खासगी रूग्णालयात आणखी एका इसमावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, रुग्णालयाच्या वतीने यापूर्वी चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या दोघांचा अहवाल ‘निगेटीव्ह’ आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेजारील लातूर, सोलापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे अनेक रूग्ण आढळून आले असून, काहींचा या आजाराने मृत्यूही झाला आहे़ त्यामुळे ‘अलर्ट’ झालेल्या आरोग्य यंत्रणेने सर्वस्तरावर दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे़ आजवर जिल्हा रूग्णालयात संशयित म्हणून एका पुरूषासह तीन महिलांची तपासणी करण्यात आली आहे़ यात त्या इसमासह एका महिलेचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे़ तर बुधवारी एका महिला अधिकाऱ्यांनी खोकल्यासह सर्दीचा त्रास होऊ लागल्याने स्वत:हूनच जिल्हा रूग्णालयात जावून घशातील थुंकीचे नमुने चाचणीसाठी दिले आहेत़
याशिवाय गुरूवारी (१९ फेब्रुवारी) परंडा तालुक्यातील लोणी येथील एक महिला देखील येथील जिल्हा रूग्णालयात संशयीत म्हणून दाखल झाली आहे़ या दोन्ही महिलांच्या थुंकीचे नमुने घेवून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्हा रूग्णालयात यापूर्वी तपासण्यात आलेल्या दोन्ही रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, दोन्ही रूग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता़ त्यांची प्रकृती चांगली असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले़
शहरातील एका खासगी रूग्णालयात तुळजापूर येथील एका महिलेला चार दिवसापूर्वी संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते़ तेथील उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे़ तर उस्मानाबाद शहरातीलच आणखी एक इसम संशयित म्हणून त्या रूग्णालयात दाखल झाला आहे़ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़
दरम्यान, परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात देवगाव येथील एक महिला संशयीत म्हणून उपचारासाठी दाखल झाली होती़ तिच्यावर औषधोपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृतीही सुधारली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘त्या’ मातेच्या तब्येतीत सुधारणा
४परंडा शहरातून सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या स्वाईन फ्लू संशयीत महिलेची प्रसुती झाली होती़ त्या महिलेसह तिचे बाळ सुरक्षित असून, त्यांची तब्येत सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़
नागरिकांनी दक्षता घ्यावी
४जिल्हा रूग्णालयासह जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ नागरिकांनीही या स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़ शिवाय काही लक्षणे आढळली तर जिल्हा रूग्णालयात येऊन तपासणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे़