तीन मटका किंग दोन वर्षांसाठी तडीपार; गुन्हेगारांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:38 IST2017-10-06T00:38:29+5:302017-10-06T00:38:29+5:30
मटका चालवून अनेकांचा संसार उध्दवस्त करणा-या तीन मटका किंगला बीड व अहमदनगर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

तीन मटका किंग दोन वर्षांसाठी तडीपार; गुन्हेगारांमध्ये खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मटका चालवून अनेकांचा संसार उध्दवस्त करणा-या तीन मटका किंगला बीड व अहमदनगर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर गुरुवारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
परशुराम गौतम गायकवाड (४०), इस्माईल लालाभाई पठाण (६०) व शेख तय्यब बादशहा (४०) सर्व रा. शिरुर असे तडीपार केलेल्या मटका किंगची नावे आहेत. या तिघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक अनेक वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. वारंवार कारवायानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. या तिघांनी मटका, जुगार चालवून अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. हाच धागा पकडून शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी प्रस्ताव तयार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी याचा पाठपुरावा केला. प्रस्तावाची सखोल चौकशी आष्टीचे उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांनी केली. त्यानंतर अधीक्षक जी. श्रीधर यांनी तडीपार करण्याची कारवाई केली.
चार ते पाच महिन्यात पंधरावर तडीपारीच्या कारवाया जी. श्रीधर यांनी केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारवायांचा धडका पोलीस अधीक्षकांनी सुरु केला आहे.