तीन लाखांची महापंगत
By Admin | Updated: April 10, 2015 00:37 IST2015-04-10T00:06:34+5:302015-04-10T00:37:17+5:30
बीड : अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या हिंगणी खुर्द गावात राज्यातील सर्वात मोठ्या नारळी सप्ताहाची गुरूवारी दुपारी सांगता झाली.

तीन लाखांची महापंगत
बीड : अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या हिंगणी खुर्द गावात राज्यातील सर्वात मोठ्या नारळी सप्ताहाची गुरूवारी दुपारी सांगता झाली. यावेळी तीन लाखांपेक्षाही अधिक भाविकांसाठी गावकऱ्यांनी महापंगत दिली. सप्ताहाची सांगता भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
हिंगणी खुर्द गावात बुधवारी सायंकाळपासूनच या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. तीन लाखांपेक्षाही अधिक भाविक नारळी सप्ताहाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पंढरीच्या यात्रेची अनुभुती या निमित्ताने भाविकांना मिळाली. गेली सहा दिवसांपासून सप्ताहाच्या नियोजनात अडीच हजार लोक गुंतले होते. ५७ वर्षानंतर दुसऱ्यांदा हा मान हिंगणी गावाला मिळाला होता. सांगता कार्यक्रमाला न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, आ. विनायक मेटे, केशवराव आंधळे, संदीप क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तीन लाख लोकांना ग्रामस्थांच्या वतीने गुलाबजामुनची महापंगत देण्यात आली. ३०० किलो खव्यापासून तीन दिवसांपासून गुलाबजामुन तयार करण्याचे काम सुरू होते. यासाठी ५६ लोक दिवस रात्र काम करत होते. ३० ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हे गुलाबजामुन ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)
काल्याच्या कीर्तनप्रसंगी नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, परीस लोखंडाचे सोने करतो. त्याप्रमाणे संतांच्या संगतीत मानवी जीवनाचे कल्याण होते. समाजाच्या सुखातच संतांचे सुख असते. बहुजन समाजातील उपेक्षितांसाठी अनेक संतांनी आयुष्य खर्ची केले.