तीन लाख भाविक दाखल
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:17:21+5:302014-08-11T01:54:18+5:30
श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़

तीन लाख भाविक दाखल
श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़ गर्दीचे व्यवस्थापन करताना संस्थानासह एसटी महामंडळ व पोलिसांची दमछाक होत आहे़
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान, श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री देवदेवेश्वर संस्थान, शेख फरीदाबाद दर्गाह या देवस्थानांवर भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ परंतु भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होवून शहरात पहिल्याच दिवशी ३ लाखांवर भाविक आल्याने पोलिस व एसटी महामंडळास व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ दर्शनासाठी आलेले ९० टक्के भाविक ४५ कि़मी़ची परिक्रम यात्रा पायी करीत असल्याने पोलिसांना जंगलासह अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावावा लागला़ तर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांना ठिकठिकाणी चहा, फराळ, पाणी पाऊच वाटून सेवा करण्याचा आनंद घेत होते़ भाविक देवतांच्या नावाच्या जयघोषात पायी मार्गक्रमण करीत होते़
पोलिस निरीक्षक डॉ़अरूण जगताप, सपोनि अनिल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांच्यासह पोलिसांनी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकावरून भाविकांना सूचना देणे, एसटीमध्ये चढताना-उतरताना भाविकांची काळजी घेणे, गडावरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवू न देणे व इतर समस्या तत्काळ सोडविण्याची खबरदारी घेत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़
एसटी महामंडळाने भाविकांची वाहतूक करण्यासाठी १०० बसेसची व्यवस्था करूनही बसेस कमी पडल्याने आगारप्रमुख पडवळ, यात्राप्रमुख बेग यांनी स्वत: घाटात वाहतुकीची कोंडी होवू नये, यात्रिकांना त्रास होवू नये याची खबरदारी घेत असल्याचे दिसून आले़ (वार्ताहर)
यात्रेत आलेले भाविक ४५ कि़मी़चे अंतर २४ तासापर्यंत चालून पूर्ण करत असून भाविकांच्या सोयीसाठी पोलिस, एसटी महामंडळ पूर्ण दक्षतेने सेवा देत आहेत़ श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी स्वयंसेवी संस्थासह दानशूर व्यक्तींकडून महाप्रसाद, अन्नदान करण्यात येत असल्याची माहिती पी़डी़चव्हाण यांनी दिली असून यासह सर्वच देवस्थानांवर अन्नदान महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे़