एका तासात आगीच्या तीन घटना
By Admin | Updated: October 31, 2016 00:53 IST2016-10-31T00:51:01+5:302016-10-31T00:53:46+5:30
नांदेड : दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा आनंद साजरा होत असताना शहरात रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आगीच्या तीन घटना घडल्या़

एका तासात आगीच्या तीन घटना
नांदेड : दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा आनंद साजरा होत असताना शहरात रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आगीच्या तीन घटना घडल्या़ जुना मोंढा येथील कापड दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले तर अन्य दोन ठिकाणच्या आगीत अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेवून आग आटोक्यात आणली़
शहरात दिवाळीसाठी बाजारपेठ फुलली असताना रविवारी संध्याकाळी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती़ लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही सुरू होती़ आनंदोत्सव साजरा सुरू असताना रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी जुना मोंढा भागात फैजल अफगाण क्लॉथ सेंटरला अचानक आग लागली़ पाहता पाहता आगीचे लोळ उठू लागले़ ही माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी रईस पाशा व अन्य कर्मचारी एका बंबासह पोहोचले़ पहिल्या मजल्यावर असलेल्या या पत्र्याच्या दुकानात पाण्याचा मारा वरील बाजूने केल्याने आग आटोक्यात आली़ ही आग आटोक्यात आणण्यासाठी २ बंब लागल्याचे अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांनी सांगितले़ या आगीत मोठे नुकसान झाले आहे़ सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही़ त्याचवेळी ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
जुना मोंढा येथील आग विझताच महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या एका विद्युत डीपीत शॉर्टसर्कीट झाले़ त्यामुळे डीपीजवळ असलेल्या कचऱ्यास आग लागली़ त्यामुळे वजिराबाद भागात भितीचे वातावरण निर्माण झाले़ अग्निशमन विभागाने तत्काळ पोहोचून आग विझवली़ तर पूर्णा रोडवर महंमद मुश्ताक यांच्या मोटारसायकल गॅरेजला रात्री सव्वा नऊच्या सुमारास आग लागली़ इथेही अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने नुकसान टळले़ शहरात एका तासात आगीच्या तीन घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच पळापळ झाली़