आयकर विभागाचे तीन हॉटेलवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:45 IST2017-10-07T00:45:22+5:302017-10-07T00:45:22+5:30
आयकर न भरणा-या बीड बायपास रोडवरील तीन हॉटेलवर आयकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी छापे टाकून कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली.

आयकर विभागाचे तीन हॉटेलवर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आयकर न भरणा-या बीड बायपास रोडवरील तीन हॉटेलवर आयकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी छापे टाकून कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली. हॉटेलवर कारवाई करण्याची वर्षभरातील ही पहिलीच वेळ आहे.
आयकर न भरणाºया करदात्यांना शोधणे, नवीन आयकरदाते निर्माण करण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. कर न भरणाºया व्यावसायिकांना शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे व त्यांना आयकराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विभागाने पाऊल टाकणे सुरू केले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर विभागाची मोहीम थंडावली होती; पण आता पुन्हा कर न भरणा-यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत शुक्रवारी बीड बायपास, झाल्टा रोडवरील त्रिमूर्ती, सोनिया व गुरूसाई या तीन हॉटेलवर छापे टाकण्यात आले.
दुपारी आयकर अधिका-यांच्या तीन पथकांनी एकाच वेळेस तीन हॉटेलवर कारवाईला सुरुवात केली. प्रत्येक पथकात ५ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. दुपारपासून या तीन हॉटेलसमोर आयकर अधिका-यांच्या गाड्या उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमधील खरेदी बिल, विक्री बिल आदी लेखाजोखाची कसून तपासणी केली जात होती. अशा कारवाईत हॉटेलमध्ये दररोज किती ग्राहक येतात. खर्च वजा होता नफा किती मिळतो याची आकडेवारी काढण्यात येते. तसेच आयकर भरला नसेल तर हॉटेल कधीपासून चालू आहे तेव्हापासूनची उलाढाल काढण्यात येईल व त्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येते. कारवाई आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कारवाई सुरू असल्याने माहिती देण्यास नकार दिला. राष्ट्रहितासाठी करदात्यांनी आयकर भरावा, असे आवाहन त्यांनी केले.