तिघांचे भाग्य उजळले
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:34:11+5:302014-07-13T00:45:29+5:30
वाळूज महानगर : दत्तक वडगावातील मोफत प्रशिक्षणामुळे वाळूज परिसरातील दोन तरुण व तरुणीची पोलीस भरतीसाठी निवड झाली आहे.

तिघांचे भाग्य उजळले
वाळूज महानगर : दत्तक वडगावातील मोफत प्रशिक्षणामुळे वाळूज परिसरातील दोन तरुण व तरुणीची पोलीस भरतीसाठी निवड झाली आहे. या तिघांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून पोलिसांचे मार्गदर्शन, तसेच जिद्द व परिश्रमांतून हे यश त्यांना मिळाले आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वडगाव कोल्हाटी गाव तीन वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. त्याचा कायापालट करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. जय जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नवले, फौजदार संजय अहिरे, पोहेकॉ. अशोक नरवडे, पोकॉ. पंडित वाघ, प्रशिक्षक बाबूराव ढेपे, लखनदास वैष्णव यांनी कठोर परिश्रम घेत गावात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले. त्यात गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग, महिलांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, साक्षरता वर्ग, दारूबंदी, पोलीस व सैन्य दलात संधी मिळण्यासाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण याचा समावेश होता. उपक्रमांमुळे गावातील गुन्हेगारी घटली होती.
राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी वडगावाला भेट देऊन या उपक्रमांची प्रशंसा केली होती.
मध्यंतरी या गावातील विविध उपक्रम पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे जवळपास तीन महिने बंद पडले होते. हे समजताच पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी गावाला भेट देऊन गावातील विविध उपक्रम सुरूच ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला होता. कालच गावातील व्यायामशाळेला व्यायामाचे साहित्य भेट देण्यात आले.
यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण- तरुणींना त्याचा लाभ मिळेल. पोलीस व सैन्यदलात भरती होण्यासाठी वडगाव कोल्हाटीत गेल्या दोन वर्षांपासून मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण तरुण व तरुणींना दिले जाते. रोज सकाळी व संध्याकाळी प्रशिक्षणार्थीचा कसून सराव करून घेत त्यांना मार्गदर्शन केले जाते. गेल्यावर्षीही या केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मीना बनसोडे व आम्रपाली बनसोडे या बहिणींची बृहन्मुंबईतील सुरक्षा विभागात निवड झाली होती. यंदा शहरात झालेल्या पोलीस भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत वडगावात प्रशिक्षण घेतलेले राहुल बबन काकडे (रा. वडगाव), गौतम विनायक जाधव (रा. तीसगाव) व मंजूषा दशरथ पनाड (रा.जोगेश्वरी) यांची निवड झाली.
स्वप्न साकार
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून घरात आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी आहेत. वडील मिस्तरी असून त्यांना आम्ही भावंडे मिळेल ते काम करून हातभार लावतो. दत्तक वडगावात पोलीस प्रशासनातर्फे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण मिळाल्यामुळे पोलीस भरतीत यशस्वी ठरलो आहे. या यशाचे श्रेय संपूर्णपणे पोलिसांना असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे पोलीस दलात कर्तव्य बजावण्याचे माझे स्वप्न साकार झाले.-राहुल काकडे
परिश्रमांचे चीज झाले
घरात प्रचंड दारिद्र्य असताना पोलीस व्हायचे, असे स्वप्न बघत होतो. गरिबी व आवश्यक साधनांचा अभाव यामुळे स्वप्न साकार होईल की नाही याची चिंता होती. मात्र, प्रशिक्षणादरम्यान सर्व वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमची काळजी घेत आम्हाला मार्गदर्शन केले. त्यामुळे कितीही कष्ट पडले तरी पोलीस व्हायचेच असे ठरविले अन् प्रयत्नांना यश मिळाले. केलेल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान आहे. -गौतम जाधव, तीसगाव
चिंता मिटली
पोलीस भरती परीक्षेत यश मिळाल्यामुळे भविष्याची चिंता मिटली आहे. आई-वडील व काका-काकूंच्या भक्कम साथीमुळे यशस्वी होता आले. वडगावात प्रशिक्षण सुरू असल्यामुळे रोज जोगेश्वरी ते वडगावापर्यंत ये-जा सुरू होती. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या प्रयत्नांमुळे नोकरीची संधी मिळाली असून भविष्याची चिंताही मिटली आहे.
ै- मंजूषा पनाड, जोगेश्वरी