तीन दिवसांपासून शाळेला कुलूप..!
By Admin | Updated: June 18, 2016 00:51 IST2016-06-18T00:40:36+5:302016-06-18T00:51:46+5:30
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. केंद्रांतर्गत असलेल्या शिवनगावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे

तीन दिवसांपासून शाळेला कुलूप..!
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. केंद्रांतर्गत असलेल्या शिवनगावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शिवनगावातील जि.प.प्रा. शाळेत एकूण १८९ विद्यार्थी असून, शाळेला २०१५ पासून मुख्याध्यापक व सहशिक्षक असे एकूण दोन पदे रिक्त आहेत. शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी वेळोवेळी गटशिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन व चर्चा करून प्रश्न मांडला. परंतु यावर काहीच उपाययोजना न झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच ग्रामस्थांनी प्रशासनाला पूर्व कल्पना देऊन शाळेला कायमस्वरूपी कुलूप ठोकले. तीन दिवस उलटूले तरी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही शाळेला कुलूपच आहे. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नसल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येते. यावेळी ग्रामस्थ संतोष तौर, दत्तात्रय तौर, अशोक तौर, मारोती तौर, शिवाजी तौर, पंकज तौर, किशोर तौर, तुषार तौर, रंजीश साबळे, भगवान तौरसह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती. शाळेला कुलूप असल्याने मुख्याध्यापक एस.जी. बोराडे हे शाळेबाहेर बसून काम करत आहेत. (वार्ताहर)