तीन जणांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
By Admin | Updated: July 10, 2014 00:47 IST2014-07-09T23:53:44+5:302014-07-10T00:47:30+5:30
सेनगाव : येथील व्यापाऱ्याला गंडा घालीत ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन लंपास केल्या प्रकरणात सेनगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली

तीन जणांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
सेनगाव : येथील व्यापाऱ्याला गंडा घालीत ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन लंपास केल्या प्रकरणात सेनगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना येथील न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
येथील आडत व्यापारी केदारमल सारडा यांच्या आडत मधील सोयाबीन नागपूर येथे पाठविण्यासाठी बोलाविलेल्या भाडे वाहतूक ट्रक चालकाने ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे २७५ पोते सोयाबीन घेऊन पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी सपोनि बालाजी येवते यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने सोयाबीन लंपास प्रकरणातील मुख्य आरोपीचा छडा लावण्यात यश मिळविले असून, व्यापाऱ्यांना नियोजित पद्धतीने गंडा घालणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. सोयाबीन लंपास करणारा रिकामा ट्रकसह पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. सोयाबीन लंपास करणाऱ्या ट्रकची नंबर प्लेट बनावट असून पूर्वनियोजित असणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपीची नावे पोलिस तपासात पुढे आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आशिष अशोक अंभोरे (रा. साखरखेडा, जि. बुलडाणा), महावीर परसराम जैन (रा .शेंदुरसना ता. सिंदखेडा, जि. बुलडाणा) व प्रभाकर हरिचंद्र शिंदे (रा. शेंदुरसना) या तीन आरोपींना अटक करीत बुधवारी सेनगाव न्यायालयासमोर उभे केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांनी दिली.
मुख्य आरोपीच्या मागावर पोलिस असून, व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीकडून अनेक गुन्ह्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)