वाहने चोरणारे तीन कॉलेजकुमार अटकेत
By Admin | Updated: February 3, 2015 01:01 IST2015-02-03T00:50:24+5:302015-02-03T01:01:25+5:30
औरंगाबाद : मौज-मस्तीसाठी घरून मिळणारा पॉकेटमनी पुरत नाही म्हणून चक्क दुचाकी चोऱ्या करून त्या पैशांवर मजा करणाऱ्या बीडच्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

वाहने चोरणारे तीन कॉलेजकुमार अटकेत
औरंगाबाद : मौज-मस्तीसाठी घरून मिळणारा पॉकेटमनी पुरत नाही म्हणून चक्क दुचाकी चोऱ्या करून त्या पैशांवर मजा करणाऱ्या बीडच्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.
प्रवीण अनिल साडेकर (१९, रा. एकतानगर, बीड), प्रतीक विजय धारासूरकर (२०, रा. मातोश्रीनगर, बीड) व शुभम् चंद्रकांत कुलकर्णी (१९, रा. माळीवाडा, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सध्या उस्मानपुऱ्यात एका खाजगी वसतिगृहात ते राहत होते. प्रवीण आणि शुभम बी. एस्सी. प्रथम वर्षाला, तर प्रतीक बीसीएसला आहे. तिघांच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखेचे फौजदार गिरीधर ठाकूर, कर्मचारी प्रदीप गोमटे, मनोज चव्हाण, अप्पासाहेब खिल्लारी, संतोष काकडे, दत्तू सांगळे, सिद्धार्थ थोरात हे काल रात्री गुन्हेगारांच्या शोधार्थ गस्त घालीत होते. शहानूरमियाँ दर्ग्याजवळ वरील तिन्ही आरोपी एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत जाताना नजरेस पडले. पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अडविले. पोलीस पाहताच तिघांना घाम फुटला. दुचाकीबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
खाक्या दाखविताच तिघांनी ‘ती’ दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडे सापडलेली ती दुचाकी गेल्याच महिन्यात त्रिमूर्ती चौक परिसरातून चोरी केली होती. या चोरीप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हाही दाखल आहे, असे तपासात समोर आले. शिवाय आरोपींकडे आणखी एक एमएच-२३ एई-५४६ या क्रमांकाची दुचाकी आढळून आली. ही दुचाकीही चोरीची असल्याचे आणि ती बीडवरून चोरल्याचे स्पष्ट झाले. या दोन दुचाकींबरोबरच आणखी तीन दुचाकी आरोपींनी बीडवरून चोरल्याचे तपासात समोर आले आहे.
ऐश करण्यासाठी...
आरोपी प्रवीण, प्रतीक व शुभम् ही सधन घरची मुले आहेत. आई- वडिलांनी शिक्षणासाठी तिघांना औरंगाबादला पाठविले होते. इकडे घरातून मिळणारा पाकीटमनी अपुरा पडत असल्याने मौजमजेसाठी या आरोपींनी दुचाकी चोऱ्या सुरू केल्या. दुचाकी चोरायची अन् मिळेल त्या किमतीत ती विकायची. त्यातून मिळालेल्या पैशांवर ऐश करायची, असा उद्योग हे तिघे करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ठाकूर हे अधिक तपास करीत आहेत.