तुळजापुरात तीन उमेदवार चर्चेत
By Admin | Updated: March 4, 2017 00:30 IST2017-03-04T00:29:02+5:302017-03-04T00:30:56+5:30
त्ळजापूर : पंचायत समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे़

तुळजापुरात तीन उमेदवार चर्चेत
त्ळजापूर : पंचायत समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे़ असे असले तरी १० पैकी तीन उमेदवार हे सभापतीपदासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या गणातून विजयी झाले आहेत़ त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला सभापतीपदी बसवितात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे़
तुळजापूर पंचायत समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे़ यंदा झालेल्या निवडणुकीतही १८ पैकी दहा जागांवर विजय मिळवित सत्ता कायम ठेवली आहे़ तर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला ७ जागा व भाजपाला १ जागा मिळाली आहे़ या निवडणुकीतही काँग्रेसने विजयी परंपरा कायम ठेवली आहे़ पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीकरीता आरक्षित झाले आहे. त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल याची उत्सुकता आहे. काँग्रेस पक्षाने सभापती, उपसभापती यांच्या नावाचे पत्ते खोलले नाहीत. सिंदफळ गणातून आ. मधुकरराव चव्हाण यांचे माजी स्वीय सहाय्यक शिवाजी गायकवाड हे विजयी झाले आहेत. तर येवती या अनुसूचित महिलांकरिता आरक्षित असलेल्या गणातून काँग्रेसच्या सोनाली बनसोडे तर होर्टी या अनुसूचित महिलाकरिता आरक्षित गणातून काँग्रेसच्या शीला गायकवाड या विजयी झाल्या आहेत. पंचायत समिती सभापतीपदी पदावर दोन महिलांसह तिघांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)